मॉल पे मॉल

Shopping-Mall
Shopping-Mall

मानसीला शॉपिंगचा नाद अलीकडेच लागला होता. आधी ती सर्वसामान्य गृहिणीसारखी इतर महिलांनी फेसबुकवर टाकलेले शॉपिंगचे फोटो पाहण्यात आनंद मानायची. नवऱ्याने पैसे दिले तरच कोठेतरी खरेदी करायची आणि पै न् पै चा हिशेबही द्यायची. मात्र, एकदा ती आजारी पडली. अनेक औषधोपचार घेतले. मात्र, गुण काही येईना. त्यानंतर ती एका स्पेशालिस्ट डॉक्टरकडे गेली. त्यावेळी डॉक्टरांनी अचूक निदान केले. अनेक महिलांच्य रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमी असते. मात्र, तुमच्यात तसं नाही. तुमच्या रक्तात शॉपिंगची कमी आहे.

आठवड्यातून दोन- तीन मॉल्स हिंडा. मनोसक्त खरेदी करा. वातावरण बदललं की आपोआप तुम्हाला बरे वाटेल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मानसी आठवडाभरात विविध मॉल्सला खरेदीसाठी गेली. खरेदी करताना तिने विविध ॲंगलने फोटो काढले आणि ते फेसबुकवर अपलोड केले. त्यानंतर तिला लाईक आणि कमेंटसही भरपूर मिळू लागल्या. त्यानंतर तिची तब्येतही झपाट्याने सुधारू लागली. मात्र, पुढे हा नित्यक्रम झाला. तिला कधी कंटाळा आला. उदास वाटू लागलं किंवा तब्येत बिघडली की डॉक्टरांकडे जाण्याऐवजी ती तातडीने एखादा मॉल्स गाठायची, तिथे खरेदी करायची. मात्र, पुढे तिच्यासमोर वेगळ्याच अडचणी जाणवू लागल्या. एवढ्या वस्तू ठेवायच्या कोठे आणि खरेदीसाठी पैसे आणायचे कोठून? मात्र, त्यावरही तिने उत्तर शोधले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकदा सकाळपासूनच तिचं डोकं दुखत होतं. कामात मन रमत नव्हतं. सगळीकडे उदासपणा जाणवू लागला. बराचवेळ ती बेडवर पडून होती. मग तिने स्वतःला सावरलं. सरळ तिने मॉल गाठला. विविध विभागामध्ये जाऊन, तिने मनोसक्त खरेदी केली. त्याचबरोबर दुसरीकडे फोटो काढून फेसबुकवर अपलोड करायचे कामही तिचे सुरूच होते. यात दोन तास कसे गेले, हे तिला कळलेसुद्धा नाही. मध्येच तिच्या नवऱ्याचा फोनही येऊन गेला. कधी नव्हे ती त्याच्याशी प्रेमाने बोलली. डबा खाल्ला का? असा लाडीकपणे प्रश्‍नही विचारला. विशेष म्हणजे त्याच्यावर कसला संशयसुद्धा घेतला नाही. बायको आपल्याशी प्रेमाने एवढे बोलतेय, हे पाहून नवरादेखील बुचकाळ्यात पडला. इकडे मानसीचा खरेदी करताना उत्साह वाढू लागला. चेहऱ्यावर तरतरीतपणा आला. तब्बल दोन तासात विविध वस्तूंच्या दोन ट्रॉली भरल्या होत्या. त्यानंतर ती काऊंटरला आली. तिथे तुडूंब गर्दी होती. मग काय दुधात साखरच की.

तिने त्या दोन्ही ट्रॉली काऊंटरलाच सोडल्या आणि ती तडक घरी आली. घरी आल्यानंतरही तिचा मूड टिकून होता. नवऱ्याला आवडते म्हणून त्याचा आवडता मेनू म्हणून तिने पावभाजी केली.  मात्र,  आठवड्यातून दोन- तीन वेळा कोणीतरी काऊंटरला सामानाने भरलेल्या ट्रॉली सोडून देत असल्याचे पाहून मॉलचे प्रशासन बुचकाळ्यात पडले. कोणीतरी टाइमपास म्हणून हा उपद्याप करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सीसीटीव्हीच्या मदतीने असं कोण करतंय, हे ही त्यांनी शोधले. आता ते मानसीच्या शोधात आहेत. मात्र, मानसीही आता शहराच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या मॉलमध्ये खरेदीसाठी जाऊ लागली आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com