डुबूक डुबूक डबके इलाज त्यावर हटके 

Puddles
Puddles

घराशेजारील छोट्या जलवाहिनीला गळती लागल्याने, घरासमोर डबके तयार झाले होते. त्यामुळे डासांचा त्रास वाढला होता. यासंदर्भात आम्ही महापालिकेतील संबंधित विभागाला प्रत्यक्ष भेटून तक्रार अर्ज दिला. आठवडाभरातच आम्हाला पत्र आले. ‘आपला तक्रार अर्ज मिळाला असून, कीटकजन्य निर्मलून विभागाकडे तो पाठविण्यात आला आहे. पुढील तीन- चार महिन्यांत औषध फवारणी होऊन, डासांचा नायनाट होईल. तोपर्यंत दररोज ‘ससाछाप’ मच्छर अगरबत्ती लावा व रात्री झोपताना अंगाला ‘मोडोमॉस’ चोळून झोपत जा.’ हे पत्र वाचून म्ही पुन्हा पत्र पाठवले, ‘आमची तक्रार डासांबाबत नाही. जलवाहिनी फुटल्याने घरासमोर डबके झाले आहे. त्यामुळे दुरुस्ती करून मिळावी’, अशी मागणी केली. त्यानंतर दोनच दिवसांनी त्यांचे पत्र मिळाले. ‘जलवाहिनी फुटल्याने घरासमोर डबके झाले आहे. दुरुस्ती करून मिळावी,’ याबाबतचा अर्ज मिळाला. डबके दुरुस्तीचा विषय असल्याने तुमचा अर्ज बांधकाम खात्याकडे पाठविण्यात आला आहे. पुढील दोन-तीन महिन्यांत तुमच्या डबक्याभोवती सीमाभिंत बांधण्यात येईल.’ हे पत्र वाचून आम्ही डोक्याला हात लावला. आम्ही पुन्हा खरमरीत पत्र पाठवले. ‘घराशेजारील जलवाहिनीची गळती दुरुस्त करावी, अशी आमची साधी आणि सरळ मागणी आहे.’ त्यावर तिकडून त्यांचे पत्र आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘जलवाहिनीच्या दुरूस्तीचा विषय असल्याने संबंधित नगरसेवकांची शिफारस अर्जासोबत जोडा. तसेच डबक्यामुळे जलजन्य व साथीच्या आजाराचा धोका आहे, असे सरकारी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणा. त्यानंतर तुमच्या शेजारच्यांचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र त्याला जोडा. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी आमच्याकडे पाठवा.’’ हे पत्र मिळाल्यानंतर पुढील पंधरा दिवस आम्ही कागदपत्रे जमा करण्यात गुंतलो. एकदाची कागदपत्रे जमविल्यानंतर आम्ही ती तातडीने पाठवून दिली. त्यानंतर महापालिकेतून पुन्हा एक पत्र आले. ‘जलवाहिनी दुरुस्त करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास आम्ही पोलिस बंदोबस्त पुरवू,’ असे संमतिपत्र तुमच्या भागातील पोलिस ठाण्यातून आणा. आम्ही तसे संमतिपत्र आणायला गेल्यानंतर तेथील हवालदाराने आम्हालाच वेड्यात काढलं. ‘‘जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी काय मोर्चा, निदर्शने करणार आहात का? मोर्चासाठी परवानगी हवीय का?

तसं काय असेल तर बोला नाहीतर फुटा.’’ असे म्हटल्यावर ही बाब आम्ही पत्राद्वारे कळवली. त्यानंतर महापालिकेतून पुन्हा पत्र आलं. ‘‘आठवडाभरात आमचे अधिकारी व इंजिनिअर गळती असलेल्या जलवाहिनीची पाहणी करण्यासाठी येतील. ते आल्यानंतर तुम्ही तिथे उपस्थित असणे अत्याआवश्‍यक आहे. त्यांच्या अहवालानंतर आम्ही पुढील कार्यवाही करू.’’ हे पत्र मिळाल्यानंतर आम्ही आठवडाभराची रजा काढली. ‘आम्ही बाहेर जायचो आणि अधिकारी मंडळी पाहणीसाठी यायची’ असं होऊ नये म्हणून आम्ही दिवस-रात्र घरीच थांबलो. मात्र, कोणीही फिरकले नाही. 

काही दिवसांनंतर आम्हाला पुन्हा पत्र मिळाले. ‘‘आमचे अधिकारी व इंजिनिअर यांनी तुमच्या घरासमोरील जलवाहिनीची पाहणी केली. मात्र, ही जलवाहिनी पूर्ण गंजून गेली आहे. त्यामुळे नव्या जलवाहिनीला परवानगी मिळाली आहे. त्यासाठीचा निधीही प्राप्त झाला आहे. पुढील सहा महिन्यांत या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे जुनी जलवाहिनी दुरुस्त करून, महापालिकेचा पैसा वाया घालवणे बरोबर नाही. त्यामुळे आणखी फक्त सहा महिने वाट पाहा. प्रश्‍न सुटला आहे, असे समजून तुमची फाईल क्लोज करीत आहोत. धन्यवाद !’’ हे पत्र वाचून आम्हाला हसावे की रडावे, हेच कळेनासे झाले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com