esakal | मोटोक्रॉस स्पर्धेची पुणे होणार राजधानी
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Road Work

मोटोक्रॉस स्पर्धेची पुणे होणार राजधानी

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

मा. महापौरसाहेब, आयुक्तसाहेब

विषय - ‘मोटोक्रॉस’ स्पर्धा घेण्याबाबत

मेहेरबानसाहेब,

कोरोनामुळे (Corona) गेली दीड वर्षे पुण्यात कोणत्याही मोठ्या क्रीडास्पर्धा (Sports Competition) झाल्या नाहीत. त्यामुळे पुणेकरांना आपले क्रीडानैपुण्य दाखवता आले नाही. जलवाहिन्यांच्या नूतनीकरणासाठी आपण शहरातील सर्व महत्त्वाचे रस्ते (Important Road) उखडले आहेत. अनेक महत्त्वाच्या रस्त्यावर राडारोडा अजूनही तसाच आहे. पुणेकरांना मोटोक्रॉस स्पर्धेचा (Motocross Competition) आनंद घेता यावा, यासाठीच आपले हे प्रयत्न चालू आहेत, हे बघून आमचे हृदय भरून आले आहे. पुण्याची ‘क्रीडानगरी’ ही ओळख टिकवण्यासाठी तुमच्या या प्रयत्नांना सलाम करणे, हे एक पुणेकर म्हणून आमचे कर्तव्यच आहे. (SL Khutwad Writes about Pune Road)

‘लक्ष्मीरस्त्यावर मोटोक्रॉस स्पर्धा घेता येईल’ असे कोणी दीड वर्षापूर्वी सांगितले असते तर सगळ्यांनी त्याला वेड्यात काढले असते. जिथे दुचाकी पार्क करण्यासाठी जागा मिळत नाही, तिथे मोटोक्रॉस स्पर्धा कशी घेणार? असा प्रश्‍न विचारून सूचना करण्याला भंडावून सोडले असते. मात्र, पुण्यात काहीही घडू शकतं, याचं प्रत्यंतर आता येत आहे. उलट मोटोक्रॉस स्पर्धेसाठी लक्ष्मीरोडसारखं ठिकाण नाही, असं अनेकजण आता छातीठोकपणे सांगितलं.

हेही वाचा: कोरोना रुग्णांकडून सक्तीनं पैसे वसुलीला बसणार चाप!

मा. साहेब, या स्पर्धेबरोबरच ‘वॉटर रायडिंग’चाही अनुभव सध्या पुणेकर घेत आहेत. सुदैवाने निसर्गाचीही त्याला उत्तम साथ मिळत आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. तसेच मोठमोठे खड्डेही आहेत. अधून-मधून सारखा पाऊस पडत असल्याने हे खड्डे पाण्याने भरले जातात. या खड्ड्यांतून जाताना पुणेकरांना ‘वॉटर रायडिंग’चा फिल आल्याशिवाय राहत नाही. फक्त हे पाणी चिखलमिश्रित असल्याने अंगावर उडाल्याने कपडे खराब होतात. त्यामुळे या खड्ड्यातून स्वच्छ पाण्याची व्यवस्था केल्यास पुणेकरांची आपल्याला दुवा मिळेल.

खोदकाम करताना मोठमोठे मातीचे ढीग रस्त्यात तसेच ठेवले आहे. त्यामागे पुणेकरांना उंच उडीची सवय लागावी, हाच हेतू आपल्या मनी असणार, यात आमच्या मनात शंका नाही. ‘अरे मी चार फूट उंच उडी मारू शकतो’ हे छातीठोकपणे केलेले विधान पुण्यात हल्ली ऐकू येतं, त्यामागे आपलीच दूरदृष्टी आहे, हे पाहून समाधान मिळतं.

उंचउडीप्रमाणेच लांब उडीचा व्यायाम पुणेकरांनी विसरू नये, यासाठी मातीचे ढीग लांब लांब पसरले जातात. अनेकजण कुटुंब कबिल्यासह हा लांब उडीचा व्यायाम करताना आम्हाला दिसून येतात. ‘मी दहा फूट लांब उडी मारतो का नाही बघ’ असे म्हणत अनेक पैजा येथे सकाळ व संध्याकाळच्या सुमारास लागलेल्या दिसतात. पैज जिंकल्यानंतर विजेत्याला डोक्यावर उचलून महापालिकेपर्यंत जंगी मिरवणूक काढली जाते. तिथे गेल्यानंतर विजेता हा महापालिकेच्या इमारतीला साष्टांग नमस्कार घालून, ‘तुमच्यामुळेच मला हे यश मिळाले’ असे म्हणून कृतज्ञता व्यक्त करतो.

हेही वाचा: दहावीच्या परीक्षा रद्द करा; 15 वर्षाच्या मुलाची कोर्टात धाव

साहेब, ऑलिंपिक स्पर्धेत एखाद्या पुणेकराला लांब उडी वा उंच उडीत सुवर्णपदक मिळाले तर याचे सारे श्रेय आपल्यालाच जाईल, हे आम्ही नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो.

ता. क. - मोटोक्रॉस स्पर्धेची राजधानी म्हणून बंगळूरची ओळख आहे. मात्र, आपल्याकडे एवढी अनुकूल परिस्थिती असताना आपण मागे का राहायचे? बंगळूरची ‘आयटी हब’ अशी ओळख आपण हिंजवडीच्या रूपाने पुसू शकतो तर मोटोक्रॉस स्पर्धेबाबतही आपण मागे राहू नये, ही विनंती. तसे झाल्यास समस्त पुणेकरांच्या वतीने लक्ष्मीरस्त्यावर आपला जाहीर सत्कार करू.कळावे, आपलाच विश्‍वासू

दि. ना. पुणेकर