ऐकाऽ... हो ऐकाऽऽ... खड्ड्यात फिरणार नौका!

खरं तर मॉन्सूनच्या पहिल्या पावसात मनोसक्त भिजायचं, हा आमचा पहिल्यापासूनचा नियम आहे.
Bad Road
Bad RoadSakal

प्रिय पावसा,

नेते मंडळी, महापालिका, लसीकरण यांच्याप्रमाणे तू ही आम्हाला गोंधळात पाडायचं ठरवलं आहेस का? दुपारी कडक ऊन पडलंय म्हणून बाहेर पडावं अन् सायंकाळी पावसात भिजून घरी यावं, असं नेहमीचं झालंय. माणसाप्रमाणे तूही ताळतंत्र सोडलंय काय, हेच कळत नाही.

खरं तर मॉन्सूनच्या पहिल्या पावसात मनोसक्त भिजायचं, हा आमचा पहिल्यापासूनचा नियम आहे. त्यासाठी आम्ही मेमधील शेवटच्या आठवड्यात मॉन्सूनचं आगमन कोठपर्यंत आलंय, हे आम्ही पेपरमधून सतत वाचत असतो व त्यानुसार भिजण्याचे नियोजन करत असतो. ‘मॉन्सून केरळमध्ये दाखल’ ही बातमी वाचून आमचे मन मोराप्रमाणे थुई थुई नाचायला लागते. त्यानुसार पुढील तीन-चार दिवसांत आम्ही पावसात मनोसक्त भिजत असतो. आजही तसंच झालं. सायंकाळी पाऊस पडायला लागल्याने हा पाऊस मॉन्सूनचा आहे, असे समजून आम्ही मनोसक्त भिजलो. सोसायटीतील अनेक मंडळी आमच्याकडे ‘या वयात नको ती थेरं’ असं म्हणून नाकं मुरडत होती. पावसात भिजून घरी आल्यानंतर सी विंगमधील हवामान खात्यात नोकरीस असलेल्या पावशेंचा आम्हाला फोन आला. की ‘हा मॉन्सूनचा पाऊस नसून, तो पूर्वमोसमी पाऊस आहे. मॉन्सून केरळातच अडकलाय’ हे ऐकून आम्हाला थंडीच वाजून आली. ‘अरे बाप रे! मॉन्सूनचा पाऊस म्हणून आम्ही भिजावं अन् तो दुसराच कोणता तरी पाऊस निघावा, ही आमची शुद्ध फसवणूक झाली. गेल्या वर्षीही मॉन्सूनचा पाऊस म्हणून आम्ही अवकाळी पावसात भिजलो होतो. पावसा, आमचा असा गोंधळ उडवून तुला कसला आनंद मिळतो? पावसात भिजून आल्यावर ‘काय लहान लेकरासारखं वागताय, जरा वयाप्रमाणं वागा’ असं टोमणा बायकोनं मारला; पण आम्ही नेहमीप्रमाणे तिकडे दुर्लक्ष केले.

पावसा, तू वेळेवर येणार नाहीस, याची महापालिकेला दरवर्षी खात्री असते. त्यामुळे नालेसफाई व भूमिगत गटारे यांची कामे उशिरा सुरू होतात. यंदा तर पुण्यातील मुख्य रस्ते खोदून ठेवले आहेत. ऑगस्टशिवाय पाऊस येणार नाही, याची खात्री बाळगूनच महापालिकेने कामांचे नियोजन केले असावे. मात्र, यंदाही तू त्यांच्या नियोजनावर पाणी फेरलेस. खोदलेले मोठमोठे खड्डे पाण्‍याने भरले आहेत. आता हे खड्डे एकमेकांना जोडले तर व्हेनिस शहराप्रमाणे पुण्यातही जलवाहतूक करता येऊ शकेल, अशी एखादी योजना आल्यास आश्‍चर्य वाटून देऊ नकोस. खरं तर मुळा-मुठा नदीतून जलवाहतूक करायची, अशी मूळ योजना आहे. मात्र, नद्यांची अवस्थाही फार बिकट आहे. तेथील गाळ काढून जलवाहतूक करणे हे प्रचंड खर्चाचं काम आहे. आता अनायासे रस्त्यावर मोठमोठे खड्डे व चारी खोदल्या आहेत. आता पाण्याने या चारीही भरल्या आहेत. आता ते फक्त एकमेकांना जोडले तर जलवाहतूक सुरू व्हायला किती वेळ लागेल? सुदैवाने पाऊस वर्षभर असल्याने या चारी व खड्डे पाण्याने भरण्यासाठी वेगळे काही करायची गरज नाही. नाही तरी या रस्त्याचा वाहतुकीसाठी फार काही उपयोग होईल, याबाबतची शंका अनेक पुणेकरांनी व्यक्त केलीच आहे.

ता. क. - पावसा, पाण्याने भरलेल्या खड्ड्यातून लहान मुलांनी कागदाच्या नावा सोडायला सुरुवात केली आहे. लहान मुलांचे हे खेळणे उद्या जलवाहतुकीसाठी सत्यात उतरल्यास आश्‍चर्य वाटून घेऊ नकोस.

कळावे, आपला विश्‍वासू जनूभाऊ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com