
‘अहो, सारखं काय ते फेसबुक आणि व्हॉटसअप. दुसरा काय कामधंदा आहे का नाही’? बायकोच्या या सततच्या वाक्याने आमची तंद्री आजही अजिबात भंगली नाही. आम्ही नेहमीप्रमाणे तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून, आमचे काम नेटाने पुढे चालू ठेवले.
‘अहो, सारखं काय ते फेसबुक आणि व्हॉटसअप. दुसरा काय कामधंदा आहे का नाही’? बायकोच्या या सततच्या वाक्याने आमची तंद्री आजही अजिबात भंगली नाही. आम्ही नेहमीप्रमाणे तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून, आमचे काम नेटाने पुढे चालू ठेवले.
‘काय हो, तुम्ही सतत त्या शेजारच्या रश्मी वहिनींच्या पोस्टला लाइक का करत बसता? काहीही पोस्ट टाकली तरी ‘व्वा ! फारच सुंदर’, ‘छान ! काय विचार आहेत तुमचे. ग्रेट’ अशा कमेंट देता. परवा त्यांनी सोसायटीच्या गेटवरील कचऱ्याचे फोटो फेसबुकवर टाकले तरी तुम्ही ‘व्वा ! फारच छान ! अशी सौंदर्यदृष्टी हवी, अशी कमेंट टाकली होती.’ यावर मात्र आम्ही चपापलो.
‘अगं रश्मी वहिनींच्याच नाही, मी सगळ्याच महिलांच्या पोस्टवर प्रोत्साहनात्मक कमेंट करतो. त्यामागे त्यांचा उत्साह वाढावा, हा हेतू असतो. शिवाय अधून- मधून ‘J1’ झाले का? अशी प्रेमाने विचारपूसही करतो.’’आम्ही खिंड लढवली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
‘मग माझ्या पोस्टला तर कधी साधं लाईकही करत नाही.’’ बायकोच्या या युक्तिवादावर आम्ही गप्प बसलो.
‘काल रश्मीताई भेटल्या होत्या. मी फेसबुक - बिसबुक असलं काही वापरत नाही. माझा नवराच ते अकाउंट चालवतो, असं त्या सांगत होत्या.’ या वाक्यावर आमचा चेहरा मात्र काळाठिक्कर पडला. ‘ही तर शुद्ध फसवणूक झाली,’ आम्ही मनातल्या मनात म्हटले.
भारतात बनलेली लस जगभरात जाईल व अनेकांचे प्राण वाचवेल
‘पण रश्मी वहिनी कुठं भेटल्या तरी तुम्ही एवढं का पुढंपुढं करता? दोन दिवसांपूर्वी त्यांची गाडी स्टार्ट होत नव्हती तर लगेचच मदतीला का धावला? इतर पुरुषही त्यावेळी आवारात होतेच की.’
‘मदत करणे हा माझा स्वभाव आहे,’ आम्ही रोखठोक उत्तर दिले. मात्र हे उत्तर आमच्या चांगलेच अंगलट आले. त्यानंतर तिने माझ्याकडून घरातील सर्व पंखे आणि फरशी पुसून घेतली. भांड्यांचा ढिगाराही घासायला लावला. तास- दीडतास कष्ट केल्याने आमची चांगलीच दमछाक झाली. असले काम करण्याची आम्हाला सवय नसल्याने आम्ही सोफ्यावर अंग टाकले. थोड्याच वेळात आम्हाला झोपेची गुंगी आली. जाग आली, त्यावेळी बायकोने मस्तपैकी मासवडीचा बेत आखला होता. त्या वासानेच आम्ही धुंद झालो. थोड्याचवेळात बायकोने ताट केले. खरं सांगतो, गेल्या कित्येक महिन्यांत असा बेत जमला नव्हता. आम्ही मासवडीवर भरपूर ताव मारला. आम्ही तिच्यावर एकदम खूष होतो. ‘‘बोल, तुला काय हवंय ते माग. तुझी इच्छा आम्ही पूर्ण करणार’’! बायकोला आनंदाने म्हटले.
देशभरात लस पोचविण्यासाठी ‘सीरम’ झाली सज्ज
ती मागून- मागून काय मागणार? दागिने, साड्या नाहीतर एक- दोन ड्रेस, आम्ही विचार केला. खरं तर सकाळचे फेसबुक पुराण तिने विसरून जावे, हा आम्ही उदार होण्याचा मुख्य हेतू होता. बायकोने आढेवेढे घेतले. पण आम्ही ठाम होतो. ‘तू मागून तर बघ, नाही दिले तर बघ,’ असे आव्हानच आम्ही तिला दिले. त्यावर ती म्हणाली, ‘शेजारच्या रश्मीवहिनींना मी मासवडी न्यायला आता बोलावले आहे. त्यावेळी माझ्यादेखत तुम्ही त्यांना ‘ताई’ म्हणून हाक मारा. भाऊबीजेला मी ओवाळणी म्हणून पैठणी देणार आहे, एवढं आश्वासन त्यांना द्या.’ बायकोच्या या मागणीवर आम्ही फक्त पंख्याकडे बघत बसलो.
Edited By - Prashant Patil