esakal | बायको माहेराहून येई अन् वाघाचं मांजर होई
sakal

बोलून बातमी शोधा

Husband-Wife

एखाद्या प्रेरणादायी वाक्याचा आपल्या मनावर मोठा प्रभाव पडतो. कधी अडचणीत सापडलो की ते वाक्य आठवल्यास आपल्याला हुरूप आल्याशिवाय राहत नाही. ‘या विश्‍वाचा पसारा अफाट आहे’, हे वाक्य आम्हाला लग्न झाल्यापासून फार प्रेरणादायी वाटते आणि घरातला पसारा आवरण्याचा बेत नेहमीच आम्हाला रद्द करावासा वाटतो.

बायको माहेराहून येई अन् वाघाचं मांजर होई

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

एखाद्या प्रेरणादायी वाक्याचा आपल्या मनावर मोठा प्रभाव पडतो. कधी अडचणीत सापडलो की ते वाक्य आठवल्यास आपल्याला हुरूप आल्याशिवाय राहत नाही. ‘या विश्‍वाचा पसारा अफाट आहे’, हे वाक्य आम्हाला लग्न झाल्यापासून फार प्रेरणादायी वाटते आणि घरातला पसारा आवरण्याचा बेत नेहमीच आम्हाला रद्द करावासा वाटतो.

रविवारी तर साखर झोपेत असतानाच हे वाक्य आम्ही पुटपुटतो. त्यानंतर बेडवरच ताज्या वर्तमानपत्रांचा ढीग घालून निवांत वाचत बसतो. बेडवर रजई अस्ताव्यस्त असते. त्यातच पंखा चालू असल्याने पेपरची पाने फडफडतात. त्यावेळी त्याच्यावर एखादे पुस्तक टाकून त्याची फडफड आम्ही बंद करतो. मध्येच चहा-नाश्‍ता येतो. त्यावेळी कप-बशी, डिश बेडवरच ठेवतो. मधूनच बायको ‘अहो, किती हा पसारा. आवरा आता’ असे म्हणते; पण आम्ही दुर्लक्ष करून, ‘अगं, आज रविवार आहे’ असं म्हणतो. मग मात्र भांड्याची आदळआपट होत राहते. तरी बरं भांड्यांचा वापर होऊ नये म्हणून प्रत्येक भांड्यावर तिचं व तिच्या माहेरच्या मंडळींचे नाव आम्ही मुद्दाम टाकलंय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बायको माहेरी गेल्यानंतर घरात पसाराच पसारा होतो. आम्ही कधीही तो आवरण्याच्या फंदात पडत नाही. ती परत येण्याच्या एक दिवस आधी साफसफाई केली की झाले. मिलिटरीतील तिचा धाकटा भाऊ सूरज येणार असल्याने कालच ती माहेरी कोल्हापूरला दहा दिवसांसाठी गेली. तिला निरोप देताना आतून आनंदाच्या उकळ्या फुटत असताना चेहरा दुःखी कष्टी केला. पंधरा वर्षांच्या अनुभवानंतर ही कला आम्ही आत्मसात केली आहे. ‘लवकर ये. काळजी घे’ या वाक्याशिवाय तासाभरात आम्ही दुसरे काही बोललो नाही. तिला गाडीत बसवून आल्यानंतर घरात येतानाच एकदम वाघासारखी एन्ट्री केली. ‘आपण कोणाला घाबरत नाही. आम्ही राजे आहोत, राजे’ असं स्वतःशीच मोठमोठ्याने बोललो. जेवण झाल्यानंतर खुशाल आम्ही पडद्याला हात पुसले. राजा कोठं रूमालाने हात पुसतो का? त्यानंतर दररोजच रविवार उजडू लागला. सोफ्यावर अस्ताव्यस्त कपडे टाका नाहीतर ओल्या पायाने घरभर नाचा. राजाला कोण बोलणार? भांडी घासण्याचा विषय तर ऑपशनला टाकला. चहासाठी दररोज वेगळे पातेले घेऊ लागलो. दोन- तीन दिवसांतच तीही संपली. मग आम्ही कढईतच चहा करू लागलो.

परीक्षेला उशीर नकोच; MPSCच्या गोंधळानंतर पुणे विद्यापीठ झालं सावध

आतापर्यंत चुलीवरील, गुळाचा आयुर्वेदिक, गवती असे चहाचे विविध प्रकार तुम्हाला माहिती असतील; पण ‘कढईतील चहा’ हा शोध आम्हीच लावला आहे. तीन-चार दिवसांतच घरात झुरळे दिसू लागली. पण वाघ कधी झुरळांना घाबरतो? आम्ही झुरळांना दूध-चपाती देऊ लागलो. लोकं कुत्रा, मांजर पाळतात. आम्ही झुरळं पाळली. आठवडाभरानं आम्ही ऑफिसमध्ये असताना बायकोचा फोन आला. ‘‘अहो, मी घरी आलेय. आज लवकर घरी या.’’ यावर आमची बोबडीच वळली. पुढचा समरप्रसंग आम्हाला दिसू लागला. ‘अगं तू दहा दिवसांनी येणार होतीस ना? मध्येच न सांगता कशी आली’? असे आम्ही बळेबळे म्हणालो. त्यानंतर ‘‘अगं मार्च एंड जवळ आल्याने दिवस-रात्र काम करावे लागते. त्यामुळे हल्ली मी ऑफिसमध्येच झोपतो. घरी यायला वेळच मिळत नाही.’ असे म्हणून वेळ मारून नेली. हे खरं वाटावं म्हणून पुढील दोन दिवस व दोन रात्री बाहेर काढल्या. तिसऱ्या दिवशी घरी जाताना स्वतःच्या काळजीपोटी मेडिकलमधून डेटॉल, आयोडिन, कापूस घेऊन गेलो. घरात प्रवेश केल्यानंतर आरशासारखे लख्ख घर पाहून मन सुखावले; पण खबरदारीचा उपाय म्हणून स्वयंपाकघरात जाऊन लाटणे दडवून ठेवले. ‘‘अगं, घरी यायला वेळच मिळायचा नाही. दिवस-रात्र काम करून, जीव अगदी वैतागून गेलाय. मार्च एंड फार वाईट.’’ आम्ही कसनुसं तोंड करीत म्हटलं.

बारामती : 5 कोटींसाठी डाळिंब व्यापाऱ्यांनी केलं मुलाला किडनॅप; चित्रपटात शोभेल असं थरारनाट्य

‘अहो, तुम्ही तर महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात आहात ना? तिथे तुम्हाला कसलं आलंय टार्गेट. पाच वाजता तर ऑफिस बंद होतं.’’ बायकोनं असं म्हटल्यावर आरशासारख्या फरशीत आम्ही आमचा चेहरा पाहिला. मात्र, तो पडल्याचे आम्हाला स्पष्ट दिसले. 

Edited By - Prashant Patil

loading image
go to top