आधीच उपाशी त्यात पोटात गोळा!

‘असा कसा विसरलात डबा? मी एवढ्या कष्टानं डबा बनवते, त्याची किंमत आहे का तुम्हाला. उद्या मलाही विसरणार नाही कशावरून? वेंधळ्यासारखं वागायचं आतातरी सोडून द्या.
Panchnama
PanchnamaSakal
Summary

‘असा कसा विसरलात डबा? मी एवढ्या कष्टानं डबा बनवते, त्याची किंमत आहे का तुम्हाला. उद्या मलाही विसरणार नाही कशावरून? वेंधळ्यासारखं वागायचं आतातरी सोडून द्या.

‘असा कसा विसरलात डबा? मी एवढ्या कष्टानं डबा बनवते, त्याची किंमत आहे का तुम्हाला. उद्या मलाही विसरणार नाही कशावरून? वेंधळ्यासारखं वागायचं आतातरी सोडून द्या. एका मोठ्या बॅंकेत तुम्ही कॅशिअर आहात, एवढं तरी लक्षात ठेवा. उद्या कॅशच विसरलात, तर आयुष्यभर ते पैसे फेडावे लागतील. तुमच्या चुकीची शिक्षा मला भोगावी लागेल. पोटाला चिमटा घेऊन, संसार करावा लागेल. पण याचा तुम्हाला काय फरक पडणार आहे का?’ शाल्मलीने शैलेंद्रला चांगलेच धारेवर धरले.

आज सकाळी बॅंकेत निघताना शैलेंद्र डबा टेबलवर विसरून आला होता. ‘डबा घरीच विसरलोय. लंच ब्रेकच्या आत तो घेऊन ये किंवा कोणाकडे तरी पाठवून दे,’ एवढाच निरोप त्याने दिला होता आणि त्यानंतर शैलेंद्रला बरंच काही ऐकून घ्यावं लागलं होतं. त्यानंतर मात्र शाल्मलीचा राग त्याने ग्राहकांवर काढायला सुरवात केली. कोणी पैसे काढण्याची स्लीप भरुन दिल्यावर ‘‘कायऽऽहेऽऽ कशालाऽऽहवेत पैसे?’ असं तो खेकसू लागला.

‘येथं सही कोण करणार? का तीपण मीच करू? हा अकाऊंट नंबर आहे की मोबाईल नंबर आहे? जिथं जी माहिती विचारलीय, तिथं तीच भरा ना. सगळीकडेच शहाणपणा दाखवण्याची गरज नाही. तुम्हाला व्यवस्थित माहिती भरता येत नाही का? आधी स्वतःचं नाव नीट लिहायला शिका मग आम्हाला शहाणपणा शिकवा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला, मी बांधील नाही, तुम्ही उद्या या. तुम्ही साहेबांना भेटा. माझा वेळ वाया घालवू नका. चला निघा.’ असा ग्राहकांबरोबर त्याचा ‘प्रेमाचा’ संवाद सुरू होता. तेवढ्यात शैलेंद्रच्या सोसायटीतील आकाश काउंटरजवळ आला. तो शैलेंद्रशी बोलायचा प्रयत्न करू लागला. मात्र, त्याला एक शब्दही न बोलू देता रांगेतील दोघे-तिघे त्याच्यावर खेकसले.

‘ओ आम्ही काय वेडे आहोत का? मुकाट्याने रांगेत या.’ असं म्हणून त्याला रांगेत येण्यास भाग पाडलं. पाच मिनिटं आकाश रांगेत उभा राहिला व परत तो काऊंटरजवळ गेला व शैलेंद्रला म्हणाला, ‘काका, मी आकाश. मी तुमच्या सोसायटीत राहतो.’ त्यावर शैलेंद्रचा रागाचा पारा चढला. ‘मग मी काय नाचू का? आमच्या सोसायटीत राहतोस, म्हणून पहिलं तुझं काम करू अशी तुझी अपेक्षा असेल, तर मला जमणार नाही. मुकाट्याने तू रांगेत ये. नियम सगळ्यांना सारखा.’ असं म्हणून आकाशला त्याने परत पाठवले.

थोड्यावेळाने लंच ब्रेक झाला. खिडकीवर त्याने तसा बोर्ड लावला. डबा नसल्यामुळे आता काय करायचं, हा त्याच्यापुढं प्रश्न होता. संगणकावर तो अर्धा तास पत्ते खेळू लागला. लंचब्रेक संपल्यानंतर पुन्हा काम करू लागला. आकाश पुन्हा काऊंटरजवळ आला.

‘काका...’ एवढंच तो म्हणाला. शैलेंद्रच्या पोटात आधीच कावळे ओरडत असल्याने त्याची चिडचिड वाढली होती. आकाशवर तो चांगलाच खेकसला. ‘तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का? मुकाट्याने रांगेत ये. नाहीतर चालता हो.’ शैलेंद्रचा आवाज वाढला होता. झालेल्या अपमानानं आकाश दु:खी झाला होता. तो रांग सोडून बॅंकेच्या बाहेर गेला. इकडं भुकेबरोबरच शैलेंद्रची चिडचिडही वाढली होती. त्याचा राग तो ग्राहकांवर काढत होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आकाश बॅंकेत परत आला. आता काऊंटरपाशी रांग नव्हती, हे पाहून तो सुखावला.

‘काका, माझ्याजवळ काकूंनी दुपारी डबा पाठवला होता. पण तुम्ही काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हतात. मग मी माझी कामे आटोपून परत आलो,’ असे म्हणून त्याने बॅगेमधून डबा काढून काउंटरवर ठेवला. ‘आता घरी कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतंय’ या विचारानं शैलेंद्रच्या पोटात गोळा आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com