रोगापेक्षा औषध भारी!

डॉक्टरसाहेब, पाणीपुरी तर मला फार आवडते. दिवसातून एकदा तरी ती मी खातोच. तसेच तुमच्या क्लिनिकसमोरील वडा-पावची काय टेस्ट आहे.
Panchnama
PanchnamaSakal
Summary

डॉक्टरसाहेब, पाणीपुरी तर मला फार आवडते. दिवसातून एकदा तरी ती मी खातोच. तसेच तुमच्या क्लिनिकसमोरील वडा-पावची काय टेस्ट आहे.

डॉक्टरसाहेब, पाणीपुरी तर मला फार आवडते. दिवसातून एकदा तरी ती मी खातोच. तसेच तुमच्या क्लिनिकसमोरील वडा-पावची काय टेस्ट आहे. सायंकाळी मी रोज येथे येतो म्हणजे येतोच. तेथील दोन वडा-पाव खाल्ल्याशिवाय मला चैनच पडत नाही. शिवाय मिसळ-पाव, वडा-सांबर, भजीपाव हेदेखील मला खूप आवडतात. आठवड्यातून दोनदा तरी आस्वाद मी घेतो आणि माझं रात्रीचं जेवण तर मी चायनीजशिवाय पूर्ण करतच नाही. आमच्या समोरच्या गल्लीतील चायनीजला काय चव आहे. तुम्ही एकदा खाल्लं ना तर रोज मागाल. आता माझी नाश्त्याची वेळ झाली आहे. समोरून दोन वडा-पाव मागवताय काय? खाता खाता चेकअप करू.’ सुधीरने डॉक्टरांना आपल्या खाण्याविषयी सविस्तर माहिती दिली.

डोकं दुखतंय म्हणून तो आज बायकोच्या आग्रहास्तव डॉक्टरांना भेटायला आला होता. डॉक्टरांनी ‘तुम्ही रोज काय खाता?’ हा प्रश्न विचारला आणि त्याने वरील उत्तर दिले.

‘दारू वगैरे काय पिता?’ डॉक्टरांच्या या प्रश्नावर तर तो कमालीचा खुश झाला. पेशंटची एवढी काळजी घेणारा डॉक्टर त्याने आतापर्यंत पाहिला नव्हता. ‘डॉक्टरसाहेब, आधी आपण चेकअप करू. नंतर बसू. माझ्या बॅगमध्ये चकणा पण आहे. संधी कधी दार ठोठावेल, सांगता येत नाही म्हणून मी चकणा बॅगमध्येच ठेवतो. आजचंच पहा ना.’ सुधीरचे बोलणे ऐकून डॉक्टर चिडले.

‘तुम्हाला खाण्या-पिण्याची अजिबात शिस्त नाही. त्यामुळं तुमचं वजन फार वाढलंय. रोज नियमित व्यायाम केला पाहिजे.’ सुधीरला तपासल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी काही औषधे लिहून दिली. ‘डॉक्टरसाहेब, या औषधांचे काही साइडइफेक्ट नाहीत ना.?’ सुधीरने विचारले. यावर मात्र चिडून डॉक्टर म्हणाले, ‘रोज तुम्ही अस्वच्छ पाणीपुरी खाता, तेलकट वडे खाता, कोठेही मिसळ-पाव चापता, निकृष्ट चायनीज खाता. त्यावेळी काही शंका येत नाही. मात्र, डॉक्टरांनी औषध दिले की ‘साइडइफेक्टची शंका कशी काय येते?’ डॉक्टरांनी विचारले.

‘अहो, आम्ही रोजच बाहेरचं खातो. त्यामुळे हे पदार्थ बनवणाऱ्यांवर विश्वास बसलाय. पण रोज आम्ही तुमच्याकडे येत नाही ना. रोज औषधे खात नाही. त्यामुळे ‘साईडईफेक्ट’चं विचारावं लागतं.’ सुधीरने खुलासा केला. त्यानंतर दोन दिवसांनी सुधीर पुन्हा दवाखान्यात आला. डॉक्टरांनी पुन्हा त्याला तपासले. ‘तुम्ही सगळं बाहेरचं खाणं बंद केलं पाहिजे.’ डॉक्टरांनी त्याला इशारा दिला. ‘ठीक आहे पण मी बाहेरून हे पदार्थ आणून घरी खाल्ले तर चालेल का?’ सुधीरने शंका विचारली. ‘तसं अजिबात करायचं नाही. घरात बनवलेली भाजी-भाकरीच खायची. तंबाखू, दारू व सिगारेट कायमस्वरूपी सोडायची. शिवाय रोज तासभर व्यायाम करायचा तरच तुमची तब्येत सुधारेल. शंभर वर्षे जगाल.’ डॉक्टरांनी त्याला समजावून सांगितले.

‘पण डॉक्टरसाहेब, शंभर वर्षे जगून मी एकटा काय करणार? माझी मित्रमंडळी तर आधीच मला सोडून गेलेली असतील. शिवाय असलं अळणी जीवन शंभर वर्षे जगण्यात काय अर्थ आहे?’ सुधीरने विचारले. त्यावर डॉक्टरांनी त्याला नीट समजावून सांगितले. आरोग्यदायी जीवनाचे महत्त्व पटवून दिले. त्यावर मात्र तब्येतीसाठी या गोष्टी सोडणं, आवश्यक असल्याचं सुधीरला पटलं पण बाहेरील खाण्या-पिण्याची इतकी दिवसांची सवय बदलणंही फार अवघड होतं. पण मनावर दगड ठेवून त्याने निर्णय घेतला. बाहेरच्या खाण्या-पिण्याची सवय बदलण्यापेक्षा त्याने डॉक्टरच बदलला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com