Panchnama : जिलेबीचं ताट अन् बायकोनं लावली वाट

‘गेले दोन तास मी ‘जिलेबी- जिलेबी’ म्हणून ओरडतोय. एकजण माझ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. ओरडून ओरडून माझ्या घशाला कोरड पडली पण कोणी साधं पाणीही दिलं नाही.
Panchnama
PanchnamaSakal
Summary

‘गेले दोन तास मी ‘जिलेबी- जिलेबी’ म्हणून ओरडतोय. एकजण माझ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. ओरडून ओरडून माझ्या घशाला कोरड पडली पण कोणी साधं पाणीही दिलं नाही.

‘गेले दोन तास मी ‘जिलेबी- जिलेबी’ म्हणून ओरडतोय. एकजण माझ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. ओरडून ओरडून माझ्या घशाला कोरड पडली पण कोणी साधं पाणीही दिलं नाही. त्यामुळे वधूपक्षाचा निषेध म्हणून मी आमरण उपोषण करतोय.’’ जांबुवंतरावांनी भर पंक्तीत हा इशारा दिल्याने वधुपक्षात खळबळ उडाली.

‘अरे तुम्ही समजता कोण? मी मुलाचा चुलत चुलत चुलत आजोबा आहे. माझ्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला परवडणार नाही, हे आधीच सांगून ठेवतो. एकतर आज सकाळी मंगल कार्यालयात वरपक्ष येत असताना मी बॅंडपथकाला ‘मुंगळाऽऽऽ मुंगळाऽऽऽ’ हे गाणं वाजवायला सांगितलं होतं पण त्यांनी आमच्याकडे साफ दुर्लक्ष केले. बरं किमान ‘‘शांताबाईऽऽऽ शांताबाईऽऽ’ हे गाणं वाजवायला काय झालं होतं. पण तेही नाही. अरे साधा बॅंडवालाही आम्हाला किंमत देत नाही म्हणजे काय? बॅंडवाल्यांच्या विरोधात माझे उपोषण सुरू असताना त्याला जोडून, मला दुसरं उपोषण करावं लागतंय, हे काय चांगलं आहे का? आम्हाला लग्नासाठी बोलावलंय की अपमान करण्यासाठी बोलवलंय.’’ जांबुवंतरावांनी रागाने म्हटले.

‘पण आजोबा दोन तास पंगतीत काय करताय?’ वरपक्षातील एकजण त्यांच्या कानाशी लागत म्हटला.

‘काय करतोय म्हणजे? जिलेबी मिळाल्याशिवाय मी बरा पंगतीवरून उठेन. दोनच काय पण चार तास लागले तरी चालतील पण जिलेबी मिळणे, हा आमचा हक्क आहे आणि तो मी मिळवीनच.’’ जांबुवंतरावांनी म्हटले.

‘आजोबा, काय झालं?’ वधूपक्षाकडील एकजण मृदू भाषेत म्हणाला.

‘काय झालं म्हणजे? वरपक्षाला काय मान आहे की नाही. आमच्या आवडीचं गाणं बॅंडवाल्यानं लावलं असतं तर बिघडलं असतं का? ‘मुंगळाऽऽऽ’ गाण्यावर नाचायची मी किती प्रॅक्टिस करत होतो. माझी मेहनत गेली का पाण्यात? याला जबाबदार कोण?’ जांबुवंतरावांनी रागाने म्हटले.

‘तुमच्यासाठी परत गाणं लावू.’ एकाने त्यांची समजूत घातली.

‘बरं रूखवाताच्या शेजारी कोण आजीबाई बसल्या आहेत. मी सहज ‘हे बेसनाचे लाडू कोणी बनवलेत?’ असा प्रश्‍न विचारला. तर त्या नथीला झटका देत माझ्या अंगावर आल्या. ‘रूखवातावरील पदार्थ चोरायचा विचार आहे काय? मी काय टाईमपास म्हणून येथे राखण बसलीय का?’ असा जाब त्यांनी मला विचारला.

‘तुमच्या रूखवतावरील पदार्थ आम्ही चोरायला आलो आहोत का? मी नवऱ्या मुलाचा चुलत चुलत चुलत आजोबा आहे.’ असे त्यांना ठणकावून सांगितले. पण त्यांनी ‘असे छपन्न चुलत चुलत चुलत आजोबा मी पाहिलेत’ असं उद्धटपणे बोलल्या. त्यांच्या या वागण्याच्या निषेधार्थ मी रूखवतासमोरच उपोषण सुरू केलं पण तेवढ्यात माईकवरून जेवणाची घोषणा झाल्याने डायनिंग हॉलमध्ये जागा मिळवण्यासाठी मी धाव घेतली. तर तिथे जिलबीवाला फिरकेना.’’ जांबुवंतरावांनी तक्रारींचा पाढा वाचला.

तेवढ्यात एकाने जिलबीचे ताट आणून जांबुवंतरावांच्या पुढे ठेवले. तेवढ्यात सत्यभामाबाई धावत आल्या.

‘अहो, तुम्हाला हाय शुगर असल्यानं मीच वाढप्यांना बजावून ठेवलं होतं, की यांना जिलेबी व इतर गोड पदार्थ अजिबात द्यायचे नाहीत. त्या बिचाऱ्यांनी सांगितलेलं ऐकलं. यात वधुपक्षाचा वा वाढप्यांचा काय संबंध आहे?’ सत्यभामाबाईंनी झापल्यावर जांबुवंतराव खाली मान घालून म्हणाले, ‘अगं मी माझ्यासाठी जिलेबी मागवत नव्हतो. माझ्या शेजारच्यांना हवी होती. पाहुणेमंडळींना सगळे पदार्थ मिळायला हवेत, ही वरपक्ष म्हणून आपली जबाबदारी नाही का?’ पण जांबुवंतरावांचा खुलासा ऐकण्यात कोणालाच स्वारस्य नव्हते. आपला खुलासा कोणी ऐकून घेत नाही म्हणून आपण उपोषणाचा इशारा द्यावा काय, या विचारात जांबुवंतराव पडले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com