वरातीमागून आलं घोडं गरब्यावरून नाट्य रंगलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

आपल्या सोसायटीत यंदा गरबा नसल्याचे पाहून जनूभाऊ सकाळीच चिडले. त्यांनी तातडीने अध्यक्ष कारंडे यांचे घर गाठले.

वरातीमागून आलं घोडं गरब्यावरून नाट्य रंगलं

आपल्या सोसायटीत यंदा गरबा नसल्याचे पाहून जनूभाऊ सकाळीच चिडले. त्यांनी तातडीने अध्यक्ष कारंडे यांचे घर गाठले. अध्यक्षपदावरून त्यांची हकालपट्टी करण्याची ही चांगली संधी असल्याचे त्यांनी ओळखले. लागोपाठ तीनवेळा त्यांनी घराची बेल वाजवली. पेंगुळलेल्या अवस्थेत कारंडे पुढे आले. दरवाजातून पातेले पुढे करत म्हणाले,

‘भैय्या, आज आधा लिटरही दूध दे ना. घर मे कोई नही है’

कारंडे आपल्याला दूधवाला भैय्या समजल्याचे पाहून, जनूभाऊंच्या रागाचा पारा आणखी चढला.

‘कारंडे, नीट डोळे उघडे ठेवून पहा. सोसायटीच्या कारभाराप्रमाणे डोळे मिटून घेऊ नका.’ जनूभाऊंनी संतापाने म्हटले. त्यावर कारंडे यांची झोप उडाली.

‘जनूभाऊ, सॉरी बरं का. मला वाटलं आमचा दूधवाला भैय्याच आलाय. त्याचाही आवाज तुमच्यासारखाच आहे. तुम्ही पूर्वी घरोघरी दुधाचा रतीब घालायचे का? त्यांच्यासारखाच आवाज कमावलाय म्हणून म्हटलं.’ कारंडे यांनी असं म्हटल्यावर जनूभाऊंना राग आला.

‘सभासदांचा अपमान करण्यासाठी आम्ही तुम्हाला अध्यक्ष केलंय का? तुमच्यावर आता अविश्‍वासाचा ठरावच आणतो.’ जनूभाऊंनी त्या वर्षातील दोनशेचाळीसावी घोषणा केली.

‘बरं एवढ्या सकाळी काय काम काढलं? सोसायटीत तुमचा कोणाशी वाद झालाय का? तसं असेल तर रविवारी भेटा.’ असं म्हणून कारंडे दार लावू लागले.

‘दुसऱ्याचं ऐकूनच घ्यायचं नाही, असं अध्यक्ष झाल्यापासून तुम्ही प्रतिज्ञा केलीय का? तसं असेल तर सांगा.’ जनूभाऊंनी असं म्हटल्यावर कारंडे शांत बसले.

‘कारंडे, हा काय प्रकार आहे? आपली सोसायटी सोडून सगळीकडे गरबा जोरात सुरू आहे. आपल्याकडेच तो का नाही? आपल्या सोसायटील महिला व मुलींनी गरबा खेळायला दुसरीकडे का जायचे? आपल्या सोसायटीत तुम्ही त्यांना सोयी- सुविधा का पुरवल्या नाहीत. अध्यक्ष म्हणून तुमची काही जबाबदारी नाही का?’ जनूभाऊंनी त्यांना धारेवर धरले.

‘अहो, गरबामुळे शांततेचा भंग होतो. आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांनी शांत झोपू नये, अशी तुमची इच्छा आहे का? रात्रभर कशाला हवाय तो धांगडधिंगा.’ असं म्हणून तुम्हीच गेल्यावर्षी माझ्याशी भांडायला आला होतात. त्यामुळे यंदा आपण गरबा ठेवला नाही.’ कारंडे यांनी खुलासा केला.

‘याला काय अर्थ आहे? गेल्यावर्षीची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी माझ्या कानांना आवाजाचा त्रास व्हायचा. त्यामुळे मी तसं बोललो. यंदा तसं काही नाही. त्यामुळे सोसायटीने गरब्यासाठी पुढाकार घ्यायला हवाय. आपणच आपल्या मुलीबाळींना प्रोत्साहन द्यायचं नाही तर दुसरं कोण देणार?’ जनूभाऊंनी म्हटलं.

‘बरं बघू काय करता येतंय का?’ कारंडे यांनी म्हटले.

‘बघू म्हणजे? दसरा-दिवाळीनंतर बघणार आहात का? नवरात्रीतच गरब्याला महत्त्व असते. नेहमीप्रमाणे वरातीमागून घोडं नाचवू नका.’ जनूभाऊंनी इशारा दिला. त्यानंतर कारंडे यांनी गरब्याविषयी नोटीस काढली. मात्र, सोसायटीतील महिला आधीच दुसरीकडे जाऊन गरबा खेळत असल्याने कोणीही प्रतिसाद दिला नाही. हे पाहून जनूभाऊंची सटकली. रात्री दहा वाजताच त्यांनी कारंडे यांचे दार ठोठावले.

‘कारंडे, हा काय प्रकार आहे? आपल्या सोसायटीत आजही गरबा का नाही?’ जनूभाऊंनी त्यांना जाब विचारला.

‘अहो, मी नोटीस काढली होती पण कोणीही आले नाही. याला मी काय करू?’ कारंडे यांनी हताशपणे म्हटले.

‘कारंडे, याचा अर्थ तुमचं सोसायटीत कोणी ऐकत नाही. तुम्हाला गंभीरपणे कोणीही घेत नाही. तुमच्या सूचनांना, नोटिसांना लोकं कचऱ्याची टोपली दाखवतात. सोसायटीत ज्यांचे कोणी ऐकत नाही, त्यांना अध्यक्षपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. तुम्ही तातडीने राजीनामा द्या. म्हणजे माझा मार्ग मोकळा होईल.’ जनूभाऊंनी त्यांना खडसावले. त्यावर कारंडे नेहमीप्रमाणे ‘बरं’ एवढेच म्हणाले.

टॅग्स :punePanchnama