esakal | रंगकामाचा ‘रंग’
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

मेलं एक काम धड करता येत नाही. किती पसारा मांडलाय. साधं फिरायलाही येत नाही,’’ बायकोने नेहमीप्रमाणे टोमणा मारला. आता घराला रंगकाम द्यायचे म्हणजे थोडी अडचण तर होणारच ना आणि राहिला प्रश्न फिरायचा. त्यासाठी पर्वती, सारसबाग, तळजाई आहे ना! घरातल्या घरात कशाला फिरायला पाहिजे? असे आम्ही मनातल्या मनात म्हटले.

रंगकामाचा ‘रंग’

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

मेलं एक काम धड करता येत नाही. किती पसारा मांडलाय. साधं फिरायलाही येत नाही,’’ बायकोने नेहमीप्रमाणे टोमणा मारला. आता घराला रंगकाम द्यायचे म्हणजे थोडी अडचण तर होणारच ना आणि राहिला प्रश्न फिरायचा. त्यासाठी पर्वती, सारसबाग, तळजाई आहे ना! घरातल्या घरात कशाला फिरायला पाहिजे? असे आम्ही मनातल्या मनात म्हटले. उघड म्हटले असते तर तासभर तरी भांडण अटळ होते. त्यामुळे आम्ही मोठ्याने फक्त ‘सॉरी’ म्हटले. केवळ वरण-भाताचा कुकर लावायचा म्हटला तरी ‘तुम्ही डाळ आणि तांदूळ निवडून द्या. धुवून द्या. कुकरच्या भांड्यात ठेवून द्या’ अशी मदतीची अपेक्षा बायको करते. मात्र, घराला रंगकाम करताना आपण त्या गावचेच नाही, असं तिचं वागणं आहे. साधी शिडी धरायला ती तयार नाही. तरी बरं तिचेच बाबा येणार आहेत म्हणून रंगकाम सुरू केलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाबा आमच्या घरी राहायला येण्यासाठी एकच दिवस राहिल्याने आम्ही दिवस-रात्र एकटेच रंगकाम करतोय. यात आमचा ‘अवतार’ काय वर्णवा. चांगले कपडे खराब होऊ नयेत म्हणून फाटके घातले आहेत. डोक्यालाही फाटके मुंडासे गुंडाळले आहे. चेहऱ्यावर व कपड्यांवर चुना, विविध रंग सांडल्याने आम्ही खरंच बिगारी दिसतोय. आता आम्ही शिडीवर चढून छताला चुना लावतोय. कामात एकदम दंग झालो असतानाच शेजारच्या सोनलवहिनी ‘चिमूटभर’ साखर न्यायला आल्या. त्यांना पाहताच आम्ही अंग चोरून घेतले. त्यांनी आम्हाला या अवतारात पाहू नये म्हणून आम्ही देवाचा धावा सुरू केला. पण आमचे नशीब एवढे कोठे थोर? त्यांचे लक्ष गेलेच.

पुण्यात दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ८ वाहने जप्त

मात्र, त्यांनी आम्हाला ओळखले नसावे. ‘‘आमच्या घरालाही रंग द्यायचा आहे. किती पैसे घ्याल,’’ वहिनींनी आमच्याकडे पहात म्हटले. ‘‘अहो, ते कोणी रंगारी किंवा बिगारी नाहीत. आमचे ‘हे’ आहेत.’’ बायकोने खुलासा केला. ‘‘काय सांगता? डिट्टो बिगारी दिसतायत,’’ असे म्हणून वहिनी खळखळून हसल्या. आता आपल्या नवऱ्याला असं कोणी म्हटल्यावर कोणत्याही स्वाभिमानी बायकोला राग येईल की नाही. पण हिने वहिनींच्या हातावर टाळी देत ‘अगदी खरं बोललं बरं का? यांचं हे ‘ध्यान’ पहिल्यापासून असंच आहे. मी आहे म्हणून हे चांगले कपडे तरी घालतात. नाही तर गबाळे ते गबाळेच.’’ असं म्हटलं. कुठं काय बोलावं आणि बोलू नये, याचा एखादा कोर्स असेल तर तो बायकोला करायला लावायची आमची फार इच्छा आहे. 

'कॅशिअरसोबत फ्लर्टिंग नको, फुकटचा सल्लाही नको'; पुण्यातल्या हॉटेलमधील मेनूकार्ड चर्चेत

सोनलवहिनींनी मला या अवतारात पाहिल्याने आमचा मूडच गेला होता. कामातील लक्ष उडाले. थोड्याच वेळात आम्ही धाड्कन जमिनीवर कोसळलो. पुढच्या अर्ध्या तासात आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. दोन्ही पाय प्लॅस्टरमध्ये होते. जनरल वॉर्डमध्ये आणल्यानंतर बायको आमच्याजवळ आली. ‘फार दुखतंय का? फार लागलं नाही ना’ असा एखादा प्रश्न ती विचारेल, अशी आमची अपेक्षा होती. पण झालं उलटंच. ‘‘माझे बाबा आपल्या घरी आल्यानंतर त्यांची सेवा करायला लागू नये म्हणूनच तुम्ही वरून उडी मारलीत ना? तुम्ही हॉस्पिटलमध्ये राहिल्यावर घरातला एवढा पसारा कोण आवरणार? अर्धवट रंगकाम आणि पसारा बघून माझ्या बाबांना काय वाटेल?’’ असे म्हणून प्लॅस्टरवर डोके ठेवूनच ती रडू लागली. वेदनेने विव्हळत आम्ही बायकोसाठी ‘कोठे काय बोलावं आणि कोठे बोलू नये’, याचा कोर्स गुगलवर शोधू लागलो.

Edited By - Prashant Patil