‘सीसीटीव्ही’च्या हाती झोपडपट्टीची सुरक्षा

‘सीसीटीव्ही’च्या हाती झोपडपट्टीची सुरक्षा

पिंपरी - सुरक्षेच्या कारणास्तव विविध कार्यालये, रेल्वे व बसस्थानके, चौक, उद्याने, गृहनिर्माण सोसायट्या, कंपन्या... अशा अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे दिसतात. या पंक्तीत पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीही आली असून, एका सामाजिक कार्यकर्त्याने पदरमोड करून सात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील बहुतांश गुन्हे उघडकीस आले असून, गुन्हेगारांवर वचक बसला आहे.

महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर गांधीनगर आहे. काही गुन्हेगारांमुळे भीतीचे वातावरण असते, तक्रार देण्यासही कुणी तयार नसते, अशा स्थितीत सामाजिक कार्यकर्ते सुधीर जगताप यांनी सहा महिन्यांपूर्वी गांधीनगरमध्ये सात ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्याचा सकारात्मक प्रतिसाद दिसू लागला असून, अनेक घटनांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज उपयुक्त ठरले आहेत. 

याबाबत जगताप म्हणाले, ‘‘सुरक्षेबाबत तत्कालीन पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सामाजिक कार्यकर्ते व सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. उपाययोजना करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून सात ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आणखी तीन ठिकाणी कॅमेरे बसविणार आहे.’’ 

असा झाला फायदा
घटना एक : 
वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी मोटारचालकावर दोनशे रुपये दंडाची कारवाई केली. दंड भरण्यास नकार दिल्याने पोलिसांनी मोटार ताब्यात घेऊन कार्यालयासमोर उभी केली. चावी कार्यालयात ठेवून रात्री घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मोटार जागेवर नव्हती. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात संबंधित तरुणाने मध्यरात्री येऊन दुसऱ्या चावीने मोटार सुरू करून नेल्याचे आढळले. त्याच्या कागदपत्रावरून घर गाठले व कारवाई करून बाराशे रुपये दंड वसूल केला. 

घटना दोन : 
दुपारी चौकात ऑटो रिक्षा उभी करून चालक जेवणासाठी घरी गेला. दोन-अडीच तासांनी परतला. त्या वेळी रिक्षाच्या हॅंडलजवळील डिक्की उघडी दिसली. त्यातील मोबाईल चोरीस गेला होता. सीसीटीव्ही फुटेज तपासले. बारा-तेरा वर्षांची पाच-सहा मुले खेळत रिक्षाजवळ आली. एक मुलगा रिक्षात चालकाच्या आसनावर बसला. उजव्या बाजूची डिक्‍की उघडली. मोबाईल काढला व पळून गेला. त्याच्याकडून मोबाईल परत मिळाला. 

घटना तीन : 
आईसोबत बोलत असलेल्या तरुणावर दहा-बारा जणांच्या टोळक्‍याने हल्ला केला. त्यांच्या हातात दगड, विटा व सिमेंटचे गट्टू होते. लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्याच्या आईला ढकलून दिले. तरुणाला फरफटत ओढत आणले. मात्र, तिथे सीसीटीव्ही असल्याचे काहींच्या लक्षात आल्याने त्यांनी साथीदारांना सांगण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत घटनास्थळाजवळील विशेष शाखेतील पोलिसाने धावत येऊन टोळक्‍याला पिटाळून लावले. फुटेजच्या आधारे ओळख पटल्याने त्यांच्यावर कारवाई करता आली. 

सीसीटीव्ही कॅमेरे तपासासाठी उपयुक्त ठरतात. गांधीनगरमधील उपक्रम स्तुत्य आहे. सर्वांनी पुढाकार घेऊन आपापल्या भागांत कॅमेरे बसवावेत. वाढदिवसानिमित्त इतर उपक्रम राबविण्यापेक्षा सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास त्यांच्या भागातील गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवता येईल. 
- कल्याण पवार,  वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पिंपरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com