स्मार्ट सिटीतील वाय-फाय ‘डिस्कनेक्‍ट’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

कधी सुरू होईल याबद्दल माहिती नाही 
पोलिस ठाणी, क्षेत्रीय कार्यालये, उद्यान अशा ठिकाणी अनेक जण मोफत इंटरनेटचा लाभ घेताना दिसत होते. मात्र ही यंत्रणा बंद असल्यामुळे नागरिकांना संपर्क कोणाला करायचा हे माहिती नव्हते. काहीनी हेल्पलाइन क्रमाकांवर संपर्क केल्यानंतर वाय- फाय यंत्रणा सुरू असून, तुमच्या मोबाईलमध्येच बिघाड असल्याचे सांगण्यात आले. अनेक ठिकाणी ही यंत्रणा बंद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्मार्ट सिटीकडून तांत्रिक बिघाड झाल्याची सरवासारव करण्यात आली. नेमकी ही यंत्रणा कधी सुरू होईल, हे सांगण्यात आलेले नाही.

येरवडा - स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी वाय- फाय यंत्रणा बसविण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांसह उद्याने, पोलिस ठाणी, महत्त्वाचे रस्ते व चौक आदी तीनशे ठिकाणांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काही ठिकाणी ही यंत्रणा पूर्णत: बंद आहे. तर काही ठिकाणी ती कासवगतीने सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

महापालिका भवनासह येरवड्यातील  हुतात्मा उद्यान, डॉ. चिमा उद्यान, पर्णकुटी चौक, येरवडा क्षेत्रीय कार्यालय, येरवडा , विश्रांतवाडी, विमानतळ पोलिस ठाणे अशा महत्त्वाच्या ठिकाणची वाय- फाय यंत्रणा ठप्प आहे. या ठिकाणी नागरिकांना मोफत इंटरनेट सेवा मिळत होती. मात्र गेल्या अनेक  दिवसांपासून ही वाय- फाय यंत्रणा बंद आहे. या संदर्भात स्मार्ट सिटी कार्यालयातील हेल्पलाइन क्रमाकांवर संपर्क केल्यानंतर काही तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. ही वाय- फाय यंत्रणा लवकरच सुरू होईल, असे अधिकाऱ्यांकडून  सांगण्यात आले. 

स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेने एल अँड टी कस्ट्रक्‍शन आणि रेलटेलच्या सहकार्याने वाय-फाय सुविधा देली आहे. महापालिका भवनामधील वाय-फाय यंत्रणा बंद आहे. तर काही ठिकाणी ती कासवगतीने सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart City Wi-Fi Service Disconnect