#PuneIssues नागरी सुविधा केंद्रात लूट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

दाखल्यांसाठी एजंट उकळतात हजारो रुपये

दाखल्यांसाठी एजंट उकळतात हजारो रुपये
पुणे - तुम्ही पंधरा हजार द्या, त्यापुढे तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुम्हाला आठ दिवसांत दाखला दिला जाईल. पंधरा हजार जास्त होतात. मग दहा. शेवटी सात हजारांत सौदा. हे संभाषण एक एजंट आणि नागरिक यांच्यातील आहे. तुम्ही नागरी सुविधा केंद्रात दाखले काढण्यासाठी जाणार असाल तर सावधान. या केंद्राबाहेर एजंटांचा सुळसुळाट आहे. नागरिकांना लवकरात लवकर दाखला देण्याचे आमिष दाखवत त्यांची लूट केली जात आहे. एका दाखल्यासाठी या एजंटांकडे सात हजार ते बारा हजार रुपये मोजावे लागत आहेत.

शिवाजीनगर येथील नागरी सुविधा केंद्राबाहेर 35 ते 40 एजंट आहेत. प्रत्येकाकडून सांगितले जाणारे कामाचे दर वेगवेगळे आहेत. नागरिक वेळेत दाखला मिळावा म्हणून तो एजंटमार्फत काढत आहेत. चौदा ते एकवीस दिवसाच्या आत दाखला देणे या केंद्रांना बंधनकारक आहे. मात्र ऑनलाइन प्रणालीमुळे दाखले मिळण्यास एक महिना किंवा त्यापेक्षा अधिक वेळ लागत आहे. एवढ्या वेळेत महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया संपेल या भीतीने नागरिक एजंटमार्फत आठ दिवसांत दाखला काढत आहेत. पैसे गेले तरी चालतील, मात्र मुलांना महाविद्यालयात प्रवेश मिळण्यात अडचणी येऊ नयेत, अशा पालकांच्या प्रतिक्रिया आहेत.

कोणताही दाखला काढायचा असल्यास पाच हजारांपासून पंधरा हजारांपर्यंत पैसे आम्ही घेतो. नागरिकांना ही सर्व कागदपत्रे आठ दिवसांत उपलब्ध करून देतो. महाविद्यालयीन प्रवेश सुरू असल्याने नागरिकांना ही कागदपत्रे वेळेत हवी असतात. त्यामुळे ते एवढी रक्कम देण्यास तयार होतात, असे एका एजंटने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

ऑनलाइन प्रणालीतील बिघाडामुळे दाखले मिळण्यास विलंब होतो. दाखला वेळेत न मिळाल्यास मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकते. माझ्या मुलीचे नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र एजंटमार्फत काढत आहे. माझ्याकडून सात हजार रुपये घेऊन तो मला सात दिवसांत ते देणार आहे.
- मनीषा (नाव बदलले आहे.)

मी येथे मुलाचे डोमिसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी आलो असता एजंटने सहा हजारांत दाखला काढून देण्याबाबत विचारणा केली. सात दिवसांमध्ये ते देण्याची हमी दिली. पण मी स्वतःच यासाठीची प्रक्रिया केली.
- सुनील रेवणकर, पालक

नागरी सुविधा केंद्रामध्ये दाखल्यांसाठी दरांचे फलक लावलेले आहेत. आम्ही सर्व प्रक्रिया सात दिवसांमध्ये पूर्ण करतो. त्यामुळे नागरिकांनी एजंटच्या आमिषाला बळी न पडता, शासकीय प्रणाली प्रक्रियेतून दाखले काढावेत.
- प्रशांत पिसाळ, तहसीलदार, हवेली.

दाखल्यांसाठी एजंट घेत असलेली रक्कम
नॉनक्रिमिलेअर- सात ते बारा हजार
डोमिसाईल - सात ते दहा हजार
उत्पन्नाचा दाखला- दीड ते अडीच हजार
जातीचा दाखला - पाच ते दहा हजार
रहिवासी दाखला- पाच ते दहा हजार

दाखल्यांसाठीचे रीतसर दर
नॉनक्रिमिलेअर - अठ्ठावन्न रुपये
डोमिसाईल - चौतीस रुपये
उत्पन्नाचा दाखला - चौतीस रुपये
जातीचा दाखला - अठ्ठावन्न रुपये
रहिवासी दाखला - चौतीस रुपये

Web Title: Smash in the civil facilities center

टॅग्स