कोण म्हणतं, सोशल मीडिया ‘निगेटिव्ह’

social_Media
social_Media

पिंपरी - ब्लॅकमेलिंग, बदनामी, एखाद्या संवेदनशील घटनेवर भडक प्रतिक्रिया, अशा स्वरूपाचे प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असल्याने अनेकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. तणावाची स्थिती निर्माण होते. मात्र, याच सोशल मीडियाचा प्रभावी वापर शहर पोलिसांनी सुरू केला असून, सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. याची अनुभूती गेल्या पंधरा दिवसांत वेगवेगळ्या घटनांमधून दिसून आली. त्या घटना कोणी बेपत्ता झालेल्या व्यक्तीसंबंधी असो की, रामजन्मभूमी-बाबरी मशीद विवादाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत. शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले आहे. 

प्रसंग १ - घरासमोर खेळत असलेली साडेतीन-चार वर्षांची संतोषी थेरगावमधून बेपत्ता झाली. परिसरात शोधूनही सापडली नाही. पोलिसांकडे तक्रार गेली. सीसीटीव्ही फुटेज तपासले. मुलगी एकटीच चालत गेल्याचे आढळले. तिचे छायाचित्र व वर्णन सोशल मीडियावर व्हायरल केले आणि अवघ्या दोन-अडीत तासांत ती सापडली. घरापासून तब्बल तीन किलोमीटर अंतरावरील काळेवाडी फाटा परिसरातील तापकीर चौकालगत. 


प्रसंग २ - काळेवाडी पाचपीर चौक परिसरात चार वर्षांचा मुलगा मिळून आला. साधारणतः सायंकाळी साडेसातच्या सुमारास. तो फक्त स्वतःचे नाव सांगायचा, ‘कुणाल’. आई-वडिलांचे नाव, पत्ता त्याला सांगता येईना. त्याचे छायाचित्र व पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांचा संपर्क क्रमांक पोलिसांनी व्हायरल केला. अवघ्या काही तासांनी त्याच्या आई-वडिलांपर्यंत माहिती पोचली आणि रात्री सव्वादहाच्या सुमारास मुलगा त्यांच्या ताब्यात मिळाला. 

प्रसंग ३ - सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी व बाबरी मशीद विवादावर निकाल दिला. दुसऱ्या दिवशी ईद व सिंधी बांधवांची मिरवणूक होती. अशा संवेदनशील परिस्थितीत पोलिसांनी, ‘प्रत्येकाच्या हालचालीवर लक्ष आहे, कायदा व सुव्यवस्था राखावी, भडक प्रतिक्रिया देऊ नये,’ असे आवाहन सोशल मीडियाच्या  माध्यमातून केले. परिणामी, वेगवेगळ्या भागातून निघालेला ईदचा जुलूस व सिंधी बांधवांची मिरवणूक शांततेत पार पडली. 


चुकीच्या गोष्टी करणारे, समाजात असंतोष पसरवून दुही निर्माण करणाऱ्यांवर आमच्या सायबर सेलचे लक्ष आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी व्हॉटस्‌ॲप, ट्‌विटरचा वापर केला जात आहे. ऑनलाइन बॅंक व्यवहार, एटीएमचा वापर, वाहने व घरांची सुरक्षा कशी राखावी, याबाबतच्या सूचना आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून घडणाऱ्या चांगल्या घटना, प्रसंग नागरिकांमध्ये पोचविल्या जात आहेत. 
- संदीप बिष्णोई, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com