सोसायटीत येणारी व्यक्ती कंटेनमेंट झोनमधील तर नाही ना? सॉफ्टवेअर देणार माहिती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

या सॉफ्टवेअरमध्ये सोसायटीमध्ये घरकामासाठी येणाऱ्या महिला आणि इतर कर्मचाऱ्यांचे राहण्याचे ठिकाण, पत्ता घेतला जातो. तसेच, कंटेनमेंट झोनमधील त्या परिसराची नावे नोंद केली जातात.

पुणे : आपल्या सोसायटीमध्ये घरकामासाठी येणारी व्यक्ती किंवा एखाद्या कार्यालयात येणारे अधिकारी, कर्मचारी हे प्रतिबंधित क्षेत्रातून (कंटेनमेंट झोन) तर येत नाहीत ना, अशी चिंता सध्या सोसायटीमधील रहिवासी आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आहे. परंतु या प्रश्नावर पुण्यातील मुकुंदनगरमधील सुजय गार्डन येथील अभियंत्याने उत्तर शोधले आहे. 

- कोरोनानंतर आता महाराष्ट्राला सगळ्यांत मोठी संधी; सांगतायत डॉ. अमोल कोल्हे

लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर आता गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना परवानगी देण्यावरून वादविवाद सुरू आहेत. घरकाम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीस परवानगी देताना ती कंटेनमेंट झोनमधील आहे की नाही, हे कसे ओळखायचे, असा प्रश्न सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना पडला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर असलेल्या शहा यांनी त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यातून 'ऑटोमेशन सी-19 जिओ चेक' या सॉफ्टवेअरची निर्मिती केली. या सॉफ्टवेअरमुळे सोसायटीमध्ये बाहेरून येणारी एखादी व्यक्ती कंटेनमेंट झोनमधील आहे किंवा नाही हे ओळखणे शक्य होणार आहे. 

- व्यसनेही झाली अनलॉक; लॉकडाउनमुळे थांबलेली तलफ पुन्हा वाढली

कंटेनमेंट झोनमधील घरकाम करणारी महिला किंवा इतर व्यक्तींना सोसायटीमध्ये प्रवेश नाकारला जात आहे. त्यामुळे सोसायट्यांमध्ये घरकाम, स्वयंपाक, धुणी-भांडी करणाऱ्या महिला, वाहनचालक, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, गाड्या धुणाऱ्या व्यक्तींच्या रोजगारावर संकट आले आहे. परंतु अशा स्वरूपाचे सॉफ्टवेअर विकसित झाल्यामुळे त्यांच्या रोजगारांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

काय आहे हे सॉफ्टवेअर :

या सॉफ्टवेअरमध्ये सोसायटीमध्ये घरकामासाठी येणाऱ्या महिला आणि इतर कर्मचाऱ्यांचे राहण्याचे ठिकाण, पत्ता घेतला जातो. तसेच, कंटेनमेंट झोनमधील त्या परिसराची नावे नोंद केली जातात. सकाळी सात वाजता सोसायटीमध्ये दररोज घरकामासाठी येणाऱ्या महिला आणि इतर कर्मचाऱ्यांची माहिती तपासली जाते. त्यावर संबंधित व्यक्ती कंटेनमेंट झोनमधील असल्यास त्या व्यक्तीला सोसायटीमध्ये कामावर बोलवायचे की नाही हे फोनवर कळविण्यात येते. तसेच, संबंधित सभासदांना त्याबाबत मेसेज जातो. कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दिले आहे. त्यावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर ती व्यक्ती कोणत्या झोनमधून आली आहे याची माहिती मिळते.‌ 

- बारावीच्या विद्यार्थ्यांनो, फार्मसी क्षेत्रात उत्तम रोजगाराच्या संधी कोणत्या आहेत, हे तुम्हाला माहित आहे का?

कोरोना कधी संपेल हे माहीत नाही. त्यामुळे आवश्यक खबरदारी घेत दैनंदिन व्यवहार पार पाडणे गरजेचे आहे. 
या सॉफ्टवेअरचा वापर सुरु केल्यामुळे सोसायटीतील सुमारे साडेचारशे कुटुंबांच्या सुरक्षिततेसोबतच घरकाम करणाऱ्या महिलांना रोजगार मिळाला आहे. 
- विजय संघवी, चेअरमन, सुजय गार्डन सोसायटी.

या सॉफ्टवेअरमुळे कोरोनाचा 100 टक्के धोका टळणार नाही. परंतु सोसायटीमध्ये येणारी व्यक्ती कंटेनमेंट झोनमधील नसेल. त्यामुळे सोसायटीमधील सुरक्षितता वाढण्यासोबतच पदाधिकारी आणि रहिवाशांचा ताण कमी होणार आहे. हे सॉफ्टवेअर सोसायटीसोबतच सरकारी आणि खासगी कार्यालयांसाठीही उपयुक्त ठरणार आहे.
- ब्रिजेन शहा

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: software will identify the person entering the society is from containment zone or not