अयोध्येशी जोडले जाणार पुणे जिल्ह्यातील या ठिकाणाचे नाते...

डाॅ. संदेश शहा
Tuesday, 4 August 2020

इंदापूर तालुक्यातील रामकुंड येथील माती श्री सकल संत वारकरी संघाच्या वतीने अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीसाठी पाठवण्यात आली. 

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील रामकुंड येथील माती श्री सकल संत वारकरी संघाच्या वतीने अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीसाठी पाठवण्यात आली. 

श्री सकल संत वारकरी संघाचे अध्यक्ष श्रीराम शिंदे महाराज यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संघ व रामकुंड ग्रामस्थांनी ही माती कुरिअर सेवेव्दारे अयोध्या येथे पाठवली. या वेळी विशाल बोंद्रे, बापूसाहेब लोखंडे, धनाजी घोडके, सुभाष जाधव, प्रल्हाद हेगडे, रामचंद्र हेगडे, हनुमंत हेगडे, प्रदिप पवार, राजीव करडे, पांडुरंग हेगडे उपस्थित होते.

शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य

याबाबत श्रीराम शिंदे महाराज यांनी सांगितले की, प्रभू श्रीराम हे बंधू लक्ष्मण व पत्नी सीतामाई यांच्यासह वनवासात असताना काही दिवस इंदापूर परिसरात आले होते. तेव्हा हा भाग दंडकारण्य म्हणून ओळखला जात होता. नीरा व भीमा नदीमध्ये श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर व कनकगिरी (आताची वडापुरी), कनकगिरीच्या पश्चिमेला सोनमाथ्याच्या शेजारी रामकुंड येथे राम-सीतेची राहुटी होती. एक दिवस पाऊस पडत होता. त्यामुळे थंडी खूप वाजत होती. त्यावेळी सीतामाईने रामाकडे स्नानासाठी गरम पाण्याची मागणी केली. त्यामुळे प्रभू रामाने लगेच एक बाण जमिनीत मारुन गरम पाण्याचा झरा तयार करून दिला. तो रामकुंड या नावाने आजही प्रसिद्ध आहे. स्नान करुन सीतामाई (जानकी) ज्या टेकडीवर जाऊन बसत ती जानाईची टेकडी म्हणून आज प्रसिद्ध आहे, अशी आख्यायिका आहे. 

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून सरकारला घरचा आहेर... 

आज देखील येथे राम नवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यामुळे राम, लक्ष्मण, सीतामाई यांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या या भूमीतील व छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत श्री मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावण झालेली ही पवित्र माती मृदा मृतीका अयोध्या येथील राम मंदिर उभारणीसाठी पाठवण्यात आली, असे शिंदे महाराज यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soil from Ramkund in Indapur taluka sent to Ayodhya