सोलापूर रस्त्यावरील बीआरटी रखडणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

रखडणारे प्रकल्प आणि आवश्‍यक निधी 
५५ कोटी  - सायकल ट्रॅक, सायकल पार्किंग
१७ कोटी  - सोलापूर रस्त्यावरील बीआरटी
१४ कोटी  - नदीकाठ सुधार योजना

पुणे - शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधा निर्माण करण्याची महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची घोषणा हवेतच विरली आहे. या सुविधांसाठीचा निधी अन्यत्र वळविल्याने सोलापूर रस्त्यावरील बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) प्रकल्प, सायकल आराखडा आदी योजना अडचणीत आल्या आहेत. नदीकाठ संवर्धनाचाही निधी अन्यत्र वळविण्यात आला आहे. 

शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न सुटावा, यासाठी तत्त्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी सायकल आराखडा, बीआरटीसाठी तरतूद केली होती. नद्यांचे आरोग्य सुधारावे, यासाठी आराखडा तयार करून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांनी या निधीचे नुकतेच वर्गीकरण केले आहे. त्यामुळे सोलापूर रस्त्यावरील बीआरटी रखडणार आहे. तसेच सायकल शेअरिंग योजना लोकप्रिय होत असताना, आता नव्याने  सायकल ट्रॅक निर्माण होणेही अवघड झाले आहे. परिणामी, सुरळीत वाहतुकीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची घोषणा हवेतच विरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निधीतून जलसंपदा विभागाची थकबाकी देण्यात आली आहे, तर सुरू असलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी काही निधी वळविण्यात आला आहे, असा दावा सत्ताधारी करीत आहेत. 

‘‘सायकल आराखड्यासाठी पुढच्या वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद करू. बीआरटीसाठीही पुन्हा नव्याने तरतूद केली जाईल. नदीकाठ संवर्धनाचा निधी मार्चपर्यंत खर्च होणार नसल्यामुळे त्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे. शहरातील वाहतुकीचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही गंभीर आहोत,’’ असे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. 

मेट्रोच्या दोन मार्गांचे काम सुरू झाले म्हणजे वाहतुकीचे सर्व प्रश्‍न सुटले, असा महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा भ्रम झाला आहे. सायकल योजना शहरासाठी आवश्‍यक असताना, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सातारा रस्त्यावरील बीआरटीचाही खेळखंडोबा झाला आहे. 
- रणजित गाडगीळ, परिसर संस्था

रखडणारे प्रकल्प आणि आवश्‍यक निधी 
५५ कोटी  - सायकल ट्रॅक, सायकल पार्किंग
१७ कोटी  - सोलापूर रस्त्यावरील बीआरटी
१४ कोटी  - नदीकाठ सुधार योजना

 

Web Title: Solapur road BRT fund divide in other project