

अवकाळी, सोसाट्याच्या वाऱ्याने रोखला पारा
मे महिन्यात दिलासा : दहा दिवसांत तापमानात घट; उकाड्यातून दिलासा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १० : एप्रिल महिन्यात यावर्षी तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअस पार गेला होता. त्यामुळे मे महिन्यातील तापमानाबद्दल चिंता व्यक्त होत होती. मात्र, बदलत्या वातावरणामुळे मे महिन्यातील पहिले दहा दिवस सोलापूरकरांसाठी एप्रिलपेक्षा बरे ठरले आहेत. गेल्या दहा दिवसांत अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि वाऱ्याचा वाढलेला वेग यामुळे तापमानाचा पारा रोखण्यास मदत झाली आहे. मे महिन्यात आतापर्यंत सोलापूरचे तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिल्याने उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा तुलनेने कमी तीव्रतेचा जाणवत आहे.
सोलापूर शहर व परिसरात १६ मेपर्यंत तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या आठवड्यातही ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे.
गेल्या आठवड्यापासून सायंकाळच्या सुमारास वाऱ्याचा वेग वाढला आहे. वाऱ्याचा वेग ताशी ५० किलोमीटरपर्यंत राहिल्याने सायंकाळी सोलापुरात अल्हाददायक वातावरण निर्माण होत आहे. दिवसभराच्या उकाड्यापासून सायंकाळच्या सुमारास काहीसा दिलासा मिळत असून, घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.
---
असे राहिले दहा दिवसांचे तापमान
(अंश सेल्सिअसमध्ये)
ता. १ : ४०.८
ता. २ : ४२.८
ता. ३ : ४२.२
ता. ४ : ४०.८
ता. ५ : ४१.१
ता. ६ : ४१.०
ता. ७ : ४०.४
ता. ८ : ३९.७
ता. ९ : ३९.७
ता. १० : ४१.६
---
महिनाअखेरपर्यंत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता
यावर्षी अंदमान बेटांवर १८ ते २५ मे दरम्यान मॉन्सूनचे आगमन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केरळ किनारपट्टीवर १ जूनच्या आसपास मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये पाऊस दाखल झाल्यानंतर साधारण १० ते १२ दिवसांनी महाराष्ट्रात मॉन्सून पोचतो, असा आजवरचा अनुभव आहे. यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत १०० टक्के समाधानकारक पावसाचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
---
प्रशासनाकडून खरीप हंगामाची तयारी सुरू
सुरवातीला ‘एल निनो’च्या प्रभावामुळे प्रशासनाने टंचाई नियोजनास सुरवात केली होती. आता हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार प्रशासनाने खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू केली आहे. खरिपासाठी आवश्यक असणारी खते, बियाणे आणि शेतकऱ्यांना पीक कर्जाचा पुरवठा यासंदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः लक्ष घातले आहे. खरिपाबरोबरच संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे.