Pune News : सूर्यावर ६० पृथ्वी मावतील एवढा सौरडाग

सूर्याच्या पृष्ठभागावर ६० पृथ्वी मावतील एवढा मोठा सौरडाग पडला असून, त्यातून निर्माण झालेल्या सौरवादळाने पृथ्वीच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे.
Solar Wind
Solar Windsakal

पुणे - सूर्याच्या पृष्ठभागावर ६० पृथ्वी मावतील एवढा मोठा सौरडाग पडला असून, त्यातून निर्माण झालेल्या सौरवादळाने पृथ्वीच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. मात्र, त्यामुळे पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवर निर्माण होणारा ‘अरोरा’ सोडता कोणताही परिणाम होणार नसल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.

सौरडाग (कोरोनल होल) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महाकाय डागाची निर्मिती शनिवारी (ता.२) सूर्याच्या विषुववृत्तीय भागात झाली होती. पुढील चोवीस तासातच हा सौरडागाने आठ लाख किलोमीटरची कक्षा गाठली होती. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (ता.४) हा सौरडाग पृथ्वीच्या दिशेने आल्याने शास्त्रज्ञांनी त्यांच्या वर्तनावर नजर ठेवली होती.

सूर्यातील चुंबकीय हालचालींमुळे निर्माण झालेल्या या सौरडागातून महाकाय सौरवादळांची निर्मिती होण्याची शक्यता असते. नुकतेच विकसित झालेल्या या सौरडागातून सौरवादळे निर्माण झाली मात्र, त्याचा पृथ्वीवर फारसा परिणाम होणार नाही. सूर्याच्या परिभ्रमण गतीमुळे तो सौरडाग आता सूर्याच्या पलीकडील बाजूला गेला आहे.सध्या सूर्याचे २५ वे सौरचक्र चालू असून, पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर असे सौरडाग दिसण्याची शक्यता आहे.

सौरचक्र म्हणजे काय?

सूर्याच्या पृष्ठभागावर सौरडागांचे प्रमाण वाढणे आणि कमी होण्याच्या चक्राला सौरचक्र असे म्हणतात. या वेळी सूर्याचा दक्षिण आणि उत्तर ध्रुव एकमेकांची जागा बदलत असतात.

सौरडाग म्हणजे काय?

प्रचंड चुंबकीय बदलामुळे सूर्याच्या पृष्ठभागावर विशिष्ट ठिकाणचा वायू, ऊर्जा, प्रकाश अवकाशात फेकली जाते, त्याला सौरडाग असे म्हणतात. भोवतालच्या भागापेक्षा तो जरा गडद असतो. जोडीने दिसणारे हे सौरडाग पृथ्वीपेक्षा मोठे असतात.

सौरवादळांचा पृथ्वीवर थेट परिणाम होतो?

क्वचितच मोठ्या सौरवादळांमुळे उपग्रहांना थोडाफार धोका संभव असून, त्या यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळालेले आहे. पृथ्वीच्या उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर कधी-कधी दिसणाऱ्या रंगबेरंगी प्रकाश शलाकांची (अरोरा) वारंवारिता यामुळे वाढते.

मोठ्या सौरवादळांमुळे पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाजवळून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या दिशानिर्देशन प्रणालीवरही परिणाम होतो. त्यामुळे त्यांना लांब अंतरावरून जाण्याचे सांगण्यात येते.

आकडे बोलतात..

- सौरचक्राचा एकूण कालावधी - ११ वर्षे

- आतापर्यंत किती सौरचक्रांचा अभ्यास झाला - २४

आदित्य एल-१ जानेवारीत गंतव्य स्थळी -

सूर्याची सध्या २५ वे सौरचक्र चालू असून, त्याचा सर्वोच्च बिंदू २०२४ मध्ये येणार आहे. नेमके याच वेळी भारताची पहिली सौरवेधशाळा आदित्य एल-१ तिच्या गंतव्य स्थळी पोचणार आहे. याबद्दल सौरभौतिकीशास्त्रज्ञ डॉ. दिबेंदू नंदी सांगतात, ‘जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात आदित्य एल-१ सूर्य आणि पृथ्वीमधील लॅग्रांजीयन पॉइंटवर पोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सौरचक्राच्या सर्वाधिक सक्रिय कालावधीची निरीक्षणे आपल्याला घेता येणार आहे. त्यामुळे सूर्यासंबंधीच्या अभ्यासात निश्चितच भर पडेल.’

महाकाय सौरडागांमधून मोठ्या सौरवादळांची शक्यता असते. पण आता निर्माण झालेल्या सौरडागामुळे सूर्याकडून येणाऱ्या सौरवाऱ्यांचा वेग ६००० किलोमीटर प्रति सेकंद येवढा वाढला आहे. मात्र, यामुळे उपग्रहांवर कोणता परिणाम होणार नाही. फार तर ध्रुवांवरील अरोरांची संख्या वाढेल.

- डॉ. दिबेंदू नंदी, सौरभौतिकशास्त्रज्ञ, आयसर कोलकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com