पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला "अच्छे दिन' 

संदीप घिसे
गुरुवार, 14 जून 2018

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात एक लाखांचे वीजबिल न भरल्यामुळे चिंचवडगाव येथील चाफेकर स्मारक समितीच्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या निवासी आश्रमशाळेचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला होता. ही संस्था अडचणीत सापडल्याची बातमी (23 सप्टेंबर2017) दै. सकाळमध्ये प्रसिद्ध झाली. या बातमीची दखल एका खासगी कंपनीने घेत 15 लाख रुपयांचा सौरउर्जेचा प्रकल्प या संस्थेला भेट दिला. दरमहा चाळीस हजारांची वीजबचत होत असल्याने आता गुरुकुलमला "अच्छे दिन' आले आहेत. 

पिंपरी (पुणे)- गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात एक लाखांचे वीजबिल न भरल्यामुळे चिंचवडगाव येथील चाफेकर स्मारक समितीच्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या निवासी आश्रमशाळेचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला होता. ही संस्था अडचणीत सापडल्याची बातमी (23 सप्टेंबर2017) दै. सकाळमध्ये प्रसिद्ध झाली. या बातमीची दखल एका खासगी कंपनीने घेत 15 लाख रुपयांचा सौरउर्जेचा प्रकल्प या संस्थेला भेट दिला. दरमहा चाळीस हजारांची वीजबचत होत असल्याने आता गुरुकुलमला "अच्छे दिन' आले आहेत. 

गुरूकुलम या विनाअनुदानीत निवासी आश्रमशाळेत भटक्‍या समाजातील 329 मुले व मुली शिक्षण घेतात. या मुलांना शिक्षणाशिवाय सुतारकाम, मूर्तीकाम, पणत्या, आकाश कंदील, बाबूंपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये विजेवर चालणारी अनेक उपकरणे आहेत. त्यामुळे दरमहा 40 हजार इतके वीजबिल येते. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात विजेचे एक लाख रुपयांचे वीजबिल न भरल्यामुळे महावितरणने येथील वीजपुरवठा 15 दिवस खंडित केला होता. 

 

नदीकिनारी हा आश्रम असून त्यात लहान मुले राहत असल्याने शिक्षकांचा पगार थांबवून त्यातून एक लाखांचे वीजबिल भरले. शिक्षकांचे पगार कोठून द्यायचे, असा प्रश्‍न संस्थेसमोर असतानाच महापालिकेने सहा लाख रुपयांचा मिळकतकर न भरल्यास आश्रमशाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. जर आश्रमशाळा सील केली तर मुलांना कुठे ठेवायचे, असा प्रश्‍न संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांच्यासमोर निर्माण झाला. संस्थेच्या आर्थिक अडचणींबाबत दै. सकाळने वृत्त प्रसिद्ध केले. यामुळे दानशूर व्यक्‍ती पुढे आल्या आणि त्यांच्याकडून तब्बल दहा लाख रुपयांची मदत गुरुकुलमला मिळाली. 

दैनंदिन खर्चाचा प्रश्‍न सुटला तरी वाढत्या विजबिलाचा खर्च कायम होता. त्यांची ही समस्या जाणून एका खासगी कंपनीने त्यांना सौरउर्जेचा प्रकल्प देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार आता 15 लाख रुपये खर्चून त्या कंपनीकडून 20 किलो वॅटचा प्रकल्प उभारला. त्यामुळे विजेचा प्रश्‍न कायमचा सुटला आहे. रात्रीच्या वेळीही येथील परिसर उजाळून निघाला आहे. 

दै.सकाळने आमची व्यथा मांडल्यानंतर दहा लाख रुपयांची मदत संस्थेला झाली. एका खासगी कंपनीने सौरउर्जेचा प्रकल्प दिल्याने वीजबिलाचा प्रश्‍न मिटला आहे. यामुळे दै."सकाळ' आणि त्यांच्या वाचकांचा मी आभारी आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: solar pannel gifted to samarasata gurukalam