रंगरेषांच्या दुनियेत रमले फौजी

पीतांबर लोहार
शुक्रवार, 18 मे 2018

पिंपरी - लष्करी जवान म्हटले की, भरदार शरीरयष्टी, रुबाबदार व्यक्तिमत्त्व, हातात स्टेनगणसारखे हत्यार असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहाते. मात्र, शहरातील दोन जवान देशाच्या संरक्षणाची सेवा करता करता कुंचल्यांच्या माध्यमातून संवेदनशील मनातील भाव रेखाटत आहेत. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन सध्या पिंपळे सौदागर येथे सुरू आहे. 

शरण गुरव आणि शंकर सपकाळ अशी लष्करी जवानांची नावे आहेत. बारावीत असताना गुरव लष्करात भरती झाले. त्यांची पहिली पोस्टिंग उत्तर सिक्कीममध्ये होती. गेल्या दोन वर्षांपासून ते औंध लष्करी कॅम्पात आहेत.

देशसेवा करतानाच त्यांनी शिक्षणही पूर्ण केले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी मराठी विषयात पदवी प्राप्त केली. चित्रकलेचा छंदही जोपासला. गुरव म्हणाले, ‘‘पैशांचा विचार करून लष्करात भरती झालो. पण, तिथे गेल्यावर पैशांपेक्षा देशसेवेचा विचार मनात जास्त भिनला. स्वतः जगायचे आणि देशासाठी लढायचे असा उद्देश ठेवला आहे. बढती मी नाकारली आहे. शिपाई म्हणून भरती झालो. शिपाई म्हणूनच निवृत्त व्हायचे आहे.’’

सातारा जिल्ह्यातील पाटण हे सपकाळ यांचे मूळगाव. २००३ मध्ये ते लष्करात भरती झाले. शाळेत असताना चित्रकलेशी संबंधित इंटरमिजिएट, इलेमेंट्री परीक्षा ते उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते पुण्यात आहेत. या काळात कला शिक्षक (एटीडी) पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. पहिल्या वर्षी प्रथम श्रेणी मिळविली आहे. द्वितीय वर्षाचा निकाल अद्याप लागलेला नाही. त्यातही प्रथम श्रेणी मिळविणार असल्याचा विश्‍वास त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. चित्रकलेबाबत सपकाळ म्हणाले, ‘‘प्रत्येक घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते. अशा विचारातूनच मी चित्र काढायला लागलो. एखादी प्रसंग आठवून चित्र काढणे जास्त आव्हानात्मक असते.’’

गावी असताना पेंटरच्या हाताखाली काम करायचो. वाहनांवर नंबर टाकणारे, जाहिराती रंगविणाऱ्यांची गंमत बघायचो. त्यामुळे छंद जडला. सुचेल त्या विषयावर चित्र काढू लागलो. सध्या अनेक पेंटिंग्स केले आहेत.
- शरण गुरव, चित्रकार व जवान

शाळेत असताना चित्रकलेची आवड होती. लष्करात सर्व्हेअरचे शिक्षण मिळाले. नकाशे काढणे, बोर्ड लिहिणे, भिंती रंगविणे यामुळे चित्रकलेचा सराव होत गेला. वेगवेगळ्या विषयांवर चित्र काढली. मात्र, प्रदर्शनात पहिल्यांदाच मांडली आहेत. 
- शंकर सकपाळ, चित्रकार व जवान

Web Title: soldier drawing