पुणे : आओ जाओ घर तुम्हारा; शासनाचे लाखो रुपये जातायत 'पाण्यात'!

निलेश बोरुडे
Wednesday, 13 January 2021

केंद्रीय जल मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या या संस्थेत सध्या सुमारे आठशे पन्नास कर्मचारी कार्यरत आहेत.​

किरकटवाडी (पुणे) : सकाळी कार्यालयीन वेळेत जायचे, हजेरी लावायची आणि लगेच बाहेर निघून यायचं. पुन्हा संध्याकाळी कार्यालय बंद व्हायच्या वेळेत सही करायला जायचं. मधल्या वेळेत कोणी तासन् तास बाहेर हॉलमध्ये बसलेला, कोणी पुजेला, कोणी टिळ्याला, कोणी लग्नाला, कोणी घरच्या कामाला तर कोणी व्यायामाला! एवढं कमी म्हणून की काय काही मटक्याचे आकडे जुळवत बसलेले असतात. बरं हे सगळं सुरू आहे शासनाच्या लाखो रुपये पगारावर. हे चित्र आहे सिंहगड रस्त्यावरील खडकवासला येथील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्थेतील.

'मुलाला वाचवायचं असेल तर ५ लाख द्या'; खुनाची धमकी देत महिला डॉक्‍टरकडे मागितली खंडणी

केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेला शंभर वर्षांपेक्षा जास्त काळाचा समृद्ध इतिहास आहे. देशातील मोठमोठी धरणे, जलविद्युत प्रकल्प, कालवे यांच्या प्रतिकृती याच संस्थेत बनविण्यात आलेल्या आहेत. सध्याही देशभरात कोठेही नविन पाण्याच्या संदर्भात प्रकल्प होणार असेल, तर त्यावर अगोदर याच केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेत संशोधन केले जाते.

केंद्रीय जल मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या या संस्थेत सध्या सुमारे आठशे पन्नास कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शासन करदात्यांच्या पैशांतून दरमहा करोडो रुपये खर्च करते; मात्र येथे काम करणारे काही कर्मचारी अनेक वर्षांपासून सकाळी येतात आणि सही करुन निघून जातात. बाहेर जाऊन आपापली खाजगी कामे करत राहतात. त्यामुळे केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्रातील काही कर्मचारी शासकीय पगार घेऊन त्यावर मौजमजा करताना दिसत आहेत.

 पुण्यातील इंजिनिअरिंगच्या तरुणीला फास्ट बाईक चालवणं पडलं महागात!​

काम करणारांवर होतोय अन्याय... 

बाहेर फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आत जे कर्मचारी प्रामाणिकपणे आपले काम करतात त्यांच्यावर अन्याय होतो, स्वत:चे काम करुन अतिरिक्त काम करावे लागते असे काही कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.

"23 मार्च 2020 पासून संस्थेच्या आत असलेली कॅन्टीन बंद आहे. त्यामुळे चहा आणि जेवणाच्या वेळेत कर्मचारी बाहेरच्या हॉटेलमध्ये जातात. येत्या काही दिवसांमध्ये आतील कॅन्टीन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर कार्यालयीन वेळेत कोणीही शासकीय कामाव्यतिरिक्त बाहेर जाणार नाही. जर कार्यालयिन वेळेत कोणी बाहेर फिरत असेल तर त्याबाबत माहिती घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे."
- अखिलेश कुमार अगरवाल, डायरेक्टर, केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्था.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Some employees of Central Water and Power Research Center Pune are seen having more fun than work