क्वारंटाइन सेंटर नव्हे, तमाशा केंद्र; कोथरुडमधील शाळेत संतापजनक प्रकार

जितेंद्र मैड
शनिवार, 27 जून 2020

कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करुन तपासणी अहवाल येईपर्यंत त्यांना महापालिकेच्या शाळेत ठेवण्यात येते. कोथरुडच्या छत्रपती संभाजी विद्यालयात क्वारंटाइन करण्यात आलेल्या काही युवकांनी शाळेत विकृत चाळे करुन विद्यामंदिराचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला.

कोथरुड (पुणे) : कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करुन तपासणी अहवाल येईपर्यंत त्यांना महापालिकेच्या शाळेत ठेवण्यात येते. कोथरुडच्या छत्रपती संभाजी विद्यालयात क्वारंटाइन करण्यात आलेल्या काही युवकांनी शाळेत विकृत चाळे करुन विद्यामंदिराचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला. अशा विकृतांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. याप्रकाराचा एक व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहे. पण, आम्ही या किळसवाण्या प्रकाराचा व्हिडिओ शेअर न करण्याचा निर्णय घेतला आहे.

डाॅक्टर दांपत्याचे तीस वर्षात हजारपेक्षा जास्त ट्रेक 

लोकमान्य वसाहत येथे राहणा-या एका कोरोना पॉझिटीव्ह महिलेच्या मुलाला विद्यालयात क्वारंटाइन केले होते. येथे रहावे लागू नये म्हणून या मुलाने शाळेमध्ये अश्लिल चाळे केले. कपडे काढून महिलांना लज्जास्पद वाटेल असे वर्तन केले. कोणालाही न जुमानता हा मुलगा आपल्या साथीदारांसह लोकमान्य वसाहत येथे पळून आला. पोलिसांना ही घटना कळल्यावर त्यांनी या मुलाच्या सहका-यांना शोधून परत शाळेत आणून सोडले. पण हा मुलगा अद्याप लोकमान्य वसाहतीमध्येच असल्याचे लोकांनी सांगितले.

'शरद पवारांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ माफी मागावी'​

कोथरुड पोलिस ठाण्याचे गुन्हे विभाग पोलिस निरीक्षक किरण बालवडकर यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की,  क्वारंटाइन केलेल्या तरुणाबद्दल आम्हाला महापालिकेकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. हा मुलगा मनोविकृत असेल तर तसे पत्र महापालिकेच्या वैद्यकीय अधिका-यांनी लिहून दिल्यास आम्ही त्याला न्यायालयाच्या आदेशानुसार मनोरुग्णालयात पाठवू शकतो. परंतु, असे कोणतेही पत्र आम्हाला महापालिकेकडून मिळालेले नाही.

अशी सुरू ठेवता येतील सलून आणि ब्यूटी पार्लर

कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे विभागीय आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांनी सांगितले की, क्वारंटाइन केलेल्या नागरिकांनी क्वारंटाइन केंद्रातच राहणे अपेक्षित आहे. परंतु काही लोक त्रास देवून घरी जाण्याचा प्रयत्न करतात. त्या सर्वांवर नियंत्रण करणे तेथे असलेल्या कर्मचा-यांच्या क्षमते बाहेर असते. या व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह असण्याची शक्यता असल्याने कर्मचारीही सुरक्षित अंतर राखून वागतात. त्याचा गैरफायदा काही लोक घेतात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी देवू केलेल्या सुविधेचा काही लोक अशा पध्दतीने गैरफायदा घेत असतील तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांनी सांगितले की, अशा पध्दतीने काही युवक त्रासदायक वर्तन करत असल्याची तक्रार आमच्यापर्यंत आली आहे. यासंदर्भात कोथरुड पोलिसांना कळवण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Some of the youths who were quarantined at the school in Kothrud did perverted tricks