"सोमेश्‍वर'चा राज्यात ऊसदराचा उच्चांक!

संतोष शेंडकर ः सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 2018-19 हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 3300 रुपये दर शनिवारी जाहीर केला.तो राज्यात सर्वाधिक असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.

प्रतिटन 3300 रुपये जाहीर;

"एफआरपी'पेक्षा सव्वापाचशे रुपये अधिक

 

सोमेश्वरनगर (पुणे) : येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 2018-19 हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 3300 रुपये दर शनिवारी जाहीर केला.तो राज्यात सर्वाधिक असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यातील कारखाने एफआरपी देण्यासाठी घायकुतीस आलेले असताना "सोमेश्वर'ने एफआरपीपेक्षा तब्बल प्रतिटन सव्वापाचशे रुपये अधिकचे देऊन विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. "सोमेश्वर'च्या व पुणे जिल्ह्याच्या इतिहासातील 3300 हा आजवरचा सर्वाधिक दर ठरला आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 2018-19 मध्ये दहा लाख चार हजार टन उसाचे गाळप करत 12.5 टक्के इतका जिल्ह्यात सर्वोच्च साखरउतारा मिळविला होता. जिल्ह्यात 12 लाख 24 हजार क्विंटल इतके सर्वाधिक साखर उत्पादन घेतले होते. उपपदार्थनिर्मितीतही सर्वोच्च उत्पादन घेतले होते. आता भाव देताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व संचालक मंडळाने दरही सर्वोच्च देऊन शब्द खरा केला. गेली चार ते पाच वर्षे तीनशे कोटींचे कर्ज फेडणाऱ्या सभासदांना ही समाधानकारक भेट ठरणार आहे.

"सोमेश्वर'ने मार्चमध्ये एफआरपी 2774 रुपये प्रतिटन पूर्ण केली. त्यावर जूनमध्ये प्रतिटन 50 रुपये प्रोत्साहन अनुदान देऊन एकूण 2824 रुपये आकडा गाठला. आता हिशेबपत्रके पूर्ण झाल्यावर एकूण 3300 रुपये दर जाहीर केला. यामुळे सभासदांना अजून 476 रुपये प्रतिटन देणे आहे. यापैकी प्रतिटन शंभर रुपये रक्कम सप्टेंबरमध्ये सभासदांना देण्यात येणार आहे.

राज्यात सद्यःस्थितीत अजूनही कित्येक कारखान्यांनी "एफआरपी'ही दिलेली नाही. नामांकित कारखाने "एफआरपी'च्या पुढे सरकलेले नाहीत. अशात प्रतिटन 3300 दर जाहीर करणारा सोमेश्वर हा एकमेव कारखाना आहे.

 

 
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने काटकसरीचा कारभार केला. सर्वोच्च क्षमतेने दर्जेदार उत्पादने घेतली. सभासद, कामगार, अधिकारी, वाहतूकदार, ऊसतोडणी कामगार या सर्वांच्या सहकार्याने हे यश मिळाले. सहवीजनिर्मिती व डिस्टिलरी प्रकल्प यातून 41 कोटी उत्पन्न मिळाले. त्यामुळेच राज्यात सर्वाधिक दर देऊ शकलो, येत्या हंगामातही सर्वोच्च दर देण्याचा प्रयत्न राहील.

पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Someshwar sugar factory gives higest rate for sugarcane