esakal | Someshwar sugar mill election | संचालकांत तेरा नवे चेहरे
sakal

बोलून बातमी शोधा

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना

सोमेश्वरनगर : संचालकांत तेरा नवे चेहरे

sakal_logo
By
संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर : राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणित सोमेश्वर विकास पॅनेलने २१-० असे एकतर्फी यश मिळविल्यामुळे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप सलग चौथ्यांदा, तर एकूण पाचव्यांदा संचालक मंडळात आले आहेत. तर माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे एका ब्रेकनंतर तिसऱ्यांदा पाऊल ठेवत आहेत. विद्यमान अध्यक्षांसह सुनील भगत, लक्ष्मण गोफणे, शैलेश रासकर, शांताराम हे मागील संचालक मंडळातील पाच चेहरे सलग दुसऱ्यांदा निवडले गेले आहेत. दरम्यान, तेरा नवे चेहरे पहिल्यांदाच संचालक होणार आहेत.

राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून संग्राम सोरटे हे ‘ब’ वर्गातून आधीच बिनविरोध झाले होते. आता वीस जागांवर निवडलेले व पंधरा हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने विक्रमी विजय मिळालेले नवे संचालक मंडळ अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांचे मिश्रण आहे. पुरुषोत्तम जगताप हे सन १९९२ च्या सत्तांतरात संचालक झाले. त्यानंतर सन २००२-०७, २००७-१५, २०१५-२१ असे सलग तीन वेळा ते संचालक होते. याहीवेळी सभासदांनी त्यांच्या कामकाजावर विश्वास टाकला आहे.

हेही वाचा: पुणेकरांचा रिक्षा प्रवास महागणार...

राजवर्धन शिंदे हे सन २००२ मध्ये संचालक मंडळात येऊन थेट अध्यक्ष झाले. त्यानंतर सन २००७-१५ च्या संचालक मंडळातही दीड वर्ष अध्यक्ष होते. आता पुन्हा संचालक झाले आहेत. सुनील भगत हे सन २००७ पासून सलग तिसऱ्यांदा संचालक झालेत. लक्ष्मण गोफणे, शैलेश रासकर सलग दुसऱ्यांदा; तर विश्वास जगताप, आनंदकुमार होळकर एका ब्रेकनंतर दुसऱ्यांदा संचालक होत आहेत. सुपे-मोरगाव पट्ट्यातून तरडोलीचे माजी सरपंच किसन तांबे व भोंडवेवाडीचे हरिभाऊ भोंडवे असे प्रथमच दोन संचालक आले आहेत. अनंता तांबे हा काँग्रेसचा चेहरा प्रथमच थेट निवडणुकीतून आला आहे.

अभिजित काकडे, ऋषिकेश गायकवाड, जितेंद्र निगडे, प्रवीण कांबळे, रणजित मोरे हे युवा चेहरे सहकार शिकणार आहेत. त्यांना आजी-माजी अध्यक्षांसह माजी प्रशासकीय अधिकारी शिवाजीराजे राजेनिंबाळकर, बाळासाहेब कामथे, विश्वास जगताप, कमल पवार या निवडून आलेल्या ज्येष्ठांची शिकवणी लाभणार आहे. तरुण उद्योजक संग्राम सोरटे हे व्यावसायिक दृष्टिकोन देऊ शकणार आहेत. सन २००७-१५ च्या संचालक मंडळात मुक्ताबाई खोमणे या संचालक होत्या. आता त्यांच्याच सूनबाई व कोऱ्हाळे खुर्दच्या माजी सरपंच प्रणीता मनोज खोमणे या संचालक झाल्या आहेत.

loading image
go to top