साखर कारखान्यांचे कंबरडे मोडणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

सोमेश्वरनगर - चालू हंगामात साखरेचे दर प्रथमच तीन हजारांपेक्षा खाली आले आहेत. गुरुवारी 2950 रुपये प्रतिक्विंटल इतक्‍या नीचांकी भावाने साखर विकली गेली. हंगामात एकूण सातशे रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे कारखान्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार असून, शेतकऱ्यांच्या चांगल्या दराच्या आशाही धुळीस मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून घसरण सुरू असताना केंद्र व राज्य सरकार सुस्त असल्याने कारखानदार हतबल होऊ लागले आहेत.

हंगाम सुरू झाला तेव्हा साखरेचे दर प्रतिक्विंटल 3650 रुपयांपर्यंत होते. परंतु, नोव्हेंबरअखेर साखरेच्या दराला हळूहळू घरघर लागली. डिसेंबर महिन्याअखेर दर 3100 रुपयांवर येऊन ठेपले. कारखान्यांनी एकत्र येत प्रतिक्विंटल 3200 रुपयांनी साखर विकण्याचा निर्णय घेतला; परंतु त्यांच्यापैकीच काहींनी कमी दरात साखर विकून फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. यामुळे जानेवारीत दर आणखी घसरले. बुधवारी श्रीगोंदा कारखान्याने 2955 रुपयांनी टेंडर ठेवूनही साखर विकली गेली नाही, तर आज सोमेश्वरने 2950 रुपयांनी टेंडर ठेवूनही किरकोळ उचल झाली.

काही कारखान्यांनी 2930 रुपये दर करून साखर विकल्याचे समजते. हे दरही स्थिर राहणार नाहीत, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने देशात साखरेचा पुरेसा साठा असतानाही आठ लाख टनांची आयात केली. व्यापाऱ्यांवर निर्बंध घातले. आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरलेले आहेतच. अशात या वर्षी देशात 250 लाख टन, तर आगामी हंगामात 290 लाख टन साखर उत्पादन होईल असा अंदाज आहे. यामुळे घसरण होत आहे. कारखान्यांनी एफआरपी अधिक दोनशे रुपये प्रतिटन देण्याचे कबूल केले होते. परंतु, आता 2400 ते 2800 रुपये प्रतिटन इतकी एफआरपी देता देता कारखाने मेटाकुटीला आले आहेत. काही कारखान्यांनी ऊसबिले लांबविली आहेत, तर काही कारखान्यांनी कामगार, वाहतूकदारांचे पगार थकविले आहेत. राज्य बॅंकेने ऊसबिलासाठी प्रतिक्विंटल 1885 रुपये उचल दिली आहे. त्यामध्ये आठशे ते हजार रुपये स्वनिधीतून टाकायचे कुठून, हे संकट कारखान्यांपुढे आहे. यामुळे तीन हजारांपेक्षा अधिकच्या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

यावर अनुदान देऊन निर्यात करा, आयातमूल्य वाढवा, बफरस्टॉक करा, एफआरपीसाठी चढ-उतार निधी निर्माण करा अशा मागण्या होत असूनही, केंद्र उदासीनच आहे. बांगलादेश, श्रीलंका या देशांना 35 लाख टन साखर लागते, त्यांना निर्यात करण्याचा विचार पुढे येत आहे; परंतु पाकिस्तानने अकराशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान देऊन पंधरा लाख टन साखर निर्यातीसाठी बाहेर काढल्याने हा ग्राहकही हातचा जाण्याची शक्‍यता आहे.

सरकारने हात द्यावा - अशोक पवार
घोडगंगा कारखान्याचे अध्यक्ष ऍड. अशोक पवार म्हणाले, 'साखरेचे दर सातशे- आठशे रुपयांनी घसरले आहेत. दर इतके नीचांकी जातील अशी कल्पनाही केली नव्हती. आता कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये आले असून, एफआरपी देणेही अवघड झाले आहे. मोलॅसिस, बगॅसलाही दर नाही. कारखानदारी भयंकर अडचणीत असून सरकारने हात द्यायला हवा.''

Web Title: someshwarnagar pune news sugar factory issue