माय- लेकराने एकाच वेळी फडकवला दहावीच्या बोर्डात झेंडा

मिलिंद संगई
Wednesday, 29 July 2020

संसाराचा गाडा ओढताना शिकण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नसलेल्या बेबी गुरव यांनी आपला दहावीतच शिकणारा मुलगा सदानंद गुरव याच्या मदतीने हे यश संपादन केले.

बारामती (पुणे) : मनात जिद्द असेल तर शिक्षणाला वयाची मर्यादा नसते, ही बाब बारामती तालुक्यातील पारवडी येथील बेबी प्रदीप गुरव यांनी दाखवून दिली आहे. संसाराचा गाडा ओढताना शिकण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नसलेल्या बेबी गुरव यांनी आपला दहावीतच शिकणारा मुलगा सदानंद गुरव याच्या मदतीने हे यश संपादन केले. दोन्ही मायलेकरं दहावीत एकाच दिवशी उत्तीर्ण झाल्याने गुरव कुटुंबात आज दुग्धशर्करा योग जमून आला.

राज्यात दहावीचा निकाल 95 टक्केे
 
बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कमध्ये कामासाठी जाणाऱ्या बेबी गुरव यांनी दहावी उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पाहिले होते, कष्ट करत संसाराचा गाडा ओढत मिळेल तेव्हा अभ्यास करुन त्यांनी 36व्या वर्षी अखेर हे स्वप्न पूर्ण केले. अवघड गणित, इंग्रजी व विज्ञान विषयाची सविस्तर माहिती सदानंद याने आईला लीलया समजून सांगितली. स्वयंपाक करताना इतर कामे करतानाही मुलाने आईला सातत्याने अभ्यासात मदत केली. 

पुण्यातील 100 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवले

बेबी गुरव या बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये पायोनिअर कॅलिकोज कंपनीमध्ये शिवणकाम करतात. शिर्सुफळ (ता. बारामती) गावातील माहेरी कौटुंबिक कारणांमुळे त्याचे दहावी पास होण्याचे स्वप्न अर्धवट राहिले. मुलगा सदानंद गुरव हा रयत शिक्षण संस्थेच्या नागेश्वर विद्यालय शेटफळगढे (ता. इंदापूर) येथे दहावीत शिकत होता. त्यांचे पती प्रदीप गुरव यांच्या प्रोत्साहनामुळे बेबी गुरव यांनी दहावीची परिक्षा देण्याचा निर्णय घेत सर्व जबाबदाऱ्या सांभाळून यश संपादन केले. जेथे जेथे वेळ मिळेल, तेथे तेथे त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले आणि घर व अभ्यास हे संतुलन साधत यश संपादन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Son and mother at the same time Successful in class X examination