ना नोकरी.. ना नवरी...

पीतांबर लोहार 
सोमवार, 23 जुलै 2018

पिंपरी - गावाला सोयीचा रस्ता नाही. रस्त्यासाठी आंदोलन केले म्हणून गुन्हे दाखल झाल्याने नोकरी नाही. उत्पन्नाचे साधन म्हणून शेती नाही. व्यवसाय करावा, तर ग्राहक नाही. त्यामुळे बेरोजगारी आणि बेरोजगार आहे म्हणून लग्न नाही, हे वास्तव आहे बोपखेलमधील तरुणांचे. ‘ना नोकरी, ना नवरी,’ अशी त्यांची अवस्था झालेली आहे. 

पिंपरी - गावाला सोयीचा रस्ता नाही. रस्त्यासाठी आंदोलन केले म्हणून गुन्हे दाखल झाल्याने नोकरी नाही. उत्पन्नाचे साधन म्हणून शेती नाही. व्यवसाय करावा, तर ग्राहक नाही. त्यामुळे बेरोजगारी आणि बेरोजगार आहे म्हणून लग्न नाही, हे वास्तव आहे बोपखेलमधील तरुणांचे. ‘ना नोकरी, ना नवरी,’ अशी त्यांची अवस्था झालेली आहे. 

बोपखेल तीन बाजूने लष्कर आणि एका बाजूने मुळा नदीने वेढलेले गाव. गावाची जमीन लष्कराच्या अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी (सीएमई) सुमारे ५० वर्षांपूर्वी संपादित झालेली. तेव्हापासून सीएमईच्या हद्दीतून दापोडीपर्यंत येण्यासाठी वहिवाट होती. दुसरा रस्ता गणेशनगरमार्गे पुणे-आळंदी रस्त्याला जोडणारा. दापोडी व बोपखेल येथील प्रवेशद्वाराजवळ प्रत्येक वेळी नोंदणी करावी लागत होती. दुचाकीस्वारास हेल्मेट सक्तीचे होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १३ मे २०१५ रोजी सीएमईच्या आवारातील रस्ता लष्कराने बंद केला. त्यामुळे बोपखेलकरांनी आंदोलन केले. पोलिसांनी लाठीमार केला. जमावाने दगडफेक केली. त्यात जखमी झालेल्या पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला. तब्बल १७८ आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. 

व्हेरिफिकेशनमध्ये फेल 
आंदोलकांची पोलिसांकडून चौकशी सुरू झाल्याने अनेकांना नोकरी गमवावी लागली. नवीन ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. गुणवत्तेनुसार सिलेक्‍शन होते. मात्र, पोलिस व्हेरिफिकेशनमध्ये गुन्हा दाखल असल्याची नोंद झाल्याने नोकरीची संधी गमवावी लागत आहे. सुरक्षारक्षकाचीही नोकरी मिळत नाही, असे अमोल यांनी सांगितले. 

गावाच्या रस्त्यासाठी नागरिकांनी आंदोलन केले आहे. त्यांची गुन्हेगारी वृत्ती नव्हती. त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत. तसेच खडकीला जोडल्या जाणाऱ्या पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे. 
- हिराबाई घुले, नगरसेविका

लग्ने मोडली
गावाला रस्ता नसल्याने अनेक भाडेकरू सोयीच्या ठिकाणी गेले. घरांचे भाडे कमी असूनही कोणी राहायला तयार नाही. शेती नसल्याने उत्पन्नाचे साधन नाही. व्यवसाय करावा, तर पुरेसे ग्राहक नसल्याने परवडत नाही. गेल्या दोन वर्षांत तीन-चार तरुणांची लग्ने मोडली. याबाबतचे वास्तव नगरसेविका हिराबाई घुले ऊर्फ नाणी यांनी सांगितले.

आंदोलकांवरील आरोप
खुनाचा प्रयत्न, बेकायदा जमाव, पोलिसांवर हल्ला, सरकारी कामात अडथळा, सरकारी मालमत्तेचे नुकसान, दंगल, असे आरोप आंदोलकांवर ठेवले गेले. यात चार अल्पवयीन मुलांचाही समावेश होता. त्यांना बालसुधारगृहात ठेवले होते. सुमारे आठ युवक अविवाहित होते. काही नोकरदार व बहुतांश कामगार होते.

Web Title: The sorrow of the young people in Bopkhel