Pune : अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील दोन कोटीचे साऊंड बाॅक्स चोरीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील दोन कोटीचे साऊंड बाॅक्स चोरीला

पुणे : 'अंधळ दळतय कुत्र पिठ खातयं" अशी अवस्था महापालिकेची झाली आहे. बिबवेवाडी येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील तब्बल दोन कोटी रुपये किंमतीची साउंड बॉक्स चोरून नेऊन त्या ऐवजी तेथे डुप्लिकेट साउंड बॉक्स लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लाॅकडाऊनमध्ये नाट्यगृह बंद असताना सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही असताना देखील हा प्रकार घडल्याने यामुळे यामध्ये महापालिकेतील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय मुख्यसभेत व्यक्त करण्यात आला.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह उभारताना २ कोटी रुपयांची अत्याधुनिक साऊंड सिस्टीम बसवण्यात आली होती. कोरोनाच्या काळात दीड वर्षांपासून नाट्यगृह बंद होती. याकाळात साठे नाट्यगृहातील बॉश कंपनीचे सुमारे १२ साऊंड चोरीले, हा प्रकार लक्षात येऊ नये म्हणून याठिकाणी डुप्लिकेट साऊंड बसवण्यात आले. विद्युत विभागातील कर्मचार्यास हा प्रकार लक्षात आल्यानंतर पुढील कारवाई त्वरीत केली नाही.

महापालिकेच्या मुख्यसभेत नगरसेवक सुभाष जगताप यांनी हा विषय मांडताच खळबळ उडाली. जगताप म्हणाले, " यामध्ये महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग असल्याशिवाय हा प्रकार होऊ शकत नाही त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे.

नगरसेवक अविनाश बागवे यांनी प्रकाराची प्रशासनाला माहिती आहे ? असा सवाल करत तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली.खुलासा करताना उपायुक्त संतोष वारुळे म्हणाले, साऊंड बाॅक्स चोरीला गेल्याचे पत्र विद्युत विभागाकडून मिळाले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. मात्र, हा प्रकार कसा घडला, कधी समोर आला, त्यानंतर काय कार्यवाही केली याची माहिती सभागृहात देण्यात आली नाही.

गणेश कला, महात्मा फुले नाट्यगृहात तोडफोड

कोरोनामध्ये गणेश कला क्रिडा मंच बंद होते, तरीही येथील २०० खुर्च्या तुटल्या आहेत. इथले सुरक्षा रक्षक काय करतात, असा प्रश्न नगरसेवक अजय खेडेकर केला. तर वानवडी येथील महात्मा फुले सभागृहातील व्हीआयपी रूमची तोडफोड झाल्याचे तसेच हा कक्ष दारुड्यांसाठी अड्डा झाला होता. त्याठिकाणी ५५० पेक्षा जास्त रिकाम्या दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता. सुरक्षा व्यवस्था काय करत होती, अशी टीका नगरसेवक प्रशांत जगताप यांनी केली.

टॅग्स :Pune News