...म्हणून पोलिसांना हवे दोन महिन्यांचे जादा वेतन

जनार्दन दांडगे
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा मंजूर केल्यास पोलिस कर्मचाऱ्यांनाही प्रतिवर्षी साठ दिवसांचा अतिरिक्त पगार द्यावा, अशी मागणी पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

 

पाच दिवसांच्या आठवड्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

लोणी काळभोर ः राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील काही दिवसांत पाच दिवसांचा आठवडा मंजूर होण्याचे संकेत आहेत. दुसरीकडे, राज्यातील पोलिस कर्मचारी बाराही महिने रात्रंदिवस काम करीत आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा मंजूर केल्यास पोलिस कर्मचाऱ्यांनाही प्रतिवर्षी साठ दिवसांचा अतिरिक्त पगार द्यावा, अशी मागणी पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत नुकतीच राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी व जिल्हा पोलिसप्रमुखांची अर्धवार्षिक बैठक पार पडली. त्यात पाटील यांनी ही मागणी केली होती.

याबाबत पाटील यांनी सांगितले की, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील काही दिवसांत पाच दिवसांचा आठवडा मंजूर होण्याचे संकेत आहेत. या कर्मचाऱ्यांना सात दिवसांऐवजी पाच दिवस काम; तर दोन दिवसांची सुटी मिळणार आहे. पोलिसही राज्य सरकारचे कर्मचारी असून अपवाद वगळता त्यांना वर्षभर आठवड्यातील सातही दिवस काम करावे लागते. साप्ताहिक सुटीही पोलिसांना घेता येत नाही, हे वास्तव आहे. राज्य कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्यास हरकत नाही. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळावा, यासाठी प्रतिवर्षी साठ दिवसांचा अतिरिक्त पगार मिळावा, अशी मागणी केली आहे.

सरकारदरबारी मागणी मांडल्याचे समाधान
पोलिस अधीक्षकांनी केलेल्या मागणीबाबत भिगवण पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा मंजूर झाला तरी, आपल्याला त्याचा लाभ होणार नाही, असे आम्हाला वाटत होते. पोलिसांची संघटना नसल्याने आमच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत दाद मागता येत नाही. सरकार आम्हाला न मागता कोणताही लाभ देत नाही. मात्र, संदीप पाटील यांनी आम्हाला साठ दिवसांचा अतिरिक्त पगार मिळावा, अशी मागणी केली. तेच आमच्यासाठी मोठे आहे. मागणी पूर्ण होवो अथवा न होवो, सरकारदरबारी आमची मागणी मांडली, यात आम्ही समाधानी आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SP demands for two months extra pay to the police