‘कोरोना’मुळे तुकाराम बिजेला विशेष स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 March 2020

अशी असेल सुविधा

  • पित्ती धर्मशाळेत भाविकांना सोय
  • संस्थानच्या वतीने यात्राकाळात महाप्रसाद उपलब्ध
  • संस्थानकडून नवीन पाच हजार गाथांची छपाई
  • वैकुंठगमनस्थानी सात कोटी रुपये खर्चाच्या भजनी मंडपाचे काम सुरू

जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत राज्याच्या कोनाकोपऱ्यांतून लाखो भाविक येत असतात. यंदा बुधवारी (ता. ११) वारी भरत असून, या पार्श्‍वभूमीवर देहूत सुरू असलेल्या विविध यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेणारी मालिका आजपासून...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

देहू - जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा बुधवारी (ता. ११) आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी केली आहे. भाविकांसाठी आरोग्य, निवारा आणि पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय संस्थानने केली आहे. तसेच, सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्य देऊळवाडा आणि संत तुकाराम महाराज वैकुंठगमन परिसरात दर दोन तासांनी स्वच्छता आणि सफाईचे काम संस्थानने हाती घेतले आहे.

जादा नफ्याचे आमिष नडले; तरुणीला... 

संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन सोहळ्याला ३७२ वर्षे होत आहेत. राज्याच्या कोनाकोपऱ्यातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या भाविकांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी केली आहे.
याबाबत संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे म्हणाले, ‘‘भाविकांच्या सुरक्षेसाठी देऊळवाड्यात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. वैकुंठगमन सोहळ्याचा ज्या ठिकाणी मुख्य कार्यक्रम असतो, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. दिंडी प्रमुखांना संस्थानने पत्रव्यवहार केला आहे. दोन दिवसांत दिंड्या देहूत दाखल होतील. नव्याने दर्शनबारीची दुरुस्ती करण्यात आलेली असून, पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. 

जनतेची दिशाभूल करणारा फसवा अर्थसंकल्प : गिरीश बापट

संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आलेले असून, आतापर्यंत संस्थानने मंदिरासाठी दीड कोटी रुपये खर्च केले आहेत. मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. शुद्ध पाण्यासाठी फिल्टर बसविण्यात आलेले आहेत. तसेच सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मंदिरात आणि देऊळवाड्यात खास सोय करण्यात आलेली आहे. दर दोन तासांनी मंदिरात स्वच्छता करण्यात येत आहे. मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. 

स्वच्छतेसाठी सोळा कर्मचारी नियुक्त केले आहेत. तसेच, देऊळवाड्यात औषधे आणि उपचार मिळावा यासाठी बाह्यरुग्णविभाग सोय करण्यात येणार आहे. स्वच्छता आणि साफसफाईसाठी प्रबोधन करण्यात येणार आहे. इंद्रायणी नदीचा घाट स्वच्छ करण्यात येत असून, नव्याने बांधण्यात आलेल्या भक्तनिवासात वारकऱ्यांची सोय करण्यात आलेली आहे. या वेळी विश्‍वस्त माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, अजित मोरे उपस्थित होते.

गेल्या सहा महिन्यांपूर्वी दूषित पाण्यामुळे इंद्रायणीतील लाखो माशांचा मृत्यू झाला. संस्थानच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून गावातील सांडपाणी इंद्रायणी नदीत सोडू नका, अशी मागणी केली. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. आजही वैकुंठस्थानाजवळ दररोज सांडपाणी नदीत सोडले जात आहे. या ठिकाणी भाविक अंघोळ करून तीर्थ म्हणून तेच पाणी पितात. कोणतीही अनुचित प्रकार घडल्यास सरकार त्यास जबाबदार असेल.
- संजय महाराज मोरे, विश्‍वस्त आणि पालखी सोहळा, देहू संस्थान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special cleaning for tukaram bij by corona virus