मणके खिळखिळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

पुणे - शहरातील रस्त्यारस्त्यांवर जागोजागी अशास्त्रीय गतिरोधकाबरोबरच रम्बलरचे पेव फुटल्याने पुणेकरांचे मणके खिळखिळे झाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात पाठदुखीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

पुणे - शहरातील रस्त्यारस्त्यांवर जागोजागी अशास्त्रीय गतिरोधकाबरोबरच रम्बलरचे पेव फुटल्याने पुणेकरांचे मणके खिळखिळे झाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात पाठदुखीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

अशास्त्रीय गतिरोधक आणि रम्बलचा थेट परिणाम आरोग्यावर होत असून, पाठदुखीचा तक्रार घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण निश्‍चित वाढल्याचे शहरातील अस्थिरोग तज्ज्ञांनी सांगितले. यापूर्वी वयाच्या साठीजवळ आलेल्या लोकांना हा त्रास होत होता. आता अगदी पस्तिशी- चाळिशीच्या मुला- मुलींनाही याचा त्रास होत आहे. रस्त्यावरील प्रवास आणि प्रवासाचा वाढलेला वेळ हे त्यामागचे मुख्य कारण आहे.

अस्थिरोग तज्ज्ञ, प्राइम सर्जिकल सेंटर येथील डॉ. सचिश्‍चंद्र गोरे म्हणाले, ‘‘उत्तम आणि शास्त्रीय गतिरोधकाचा मानवी शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. त्यातून वाहतुकीतील सुरक्षितताही वाढते. विशिष्ट वेगाने वाहन गतिरोधकावरून पुढे जाते आणि उतरते. पण अशास्त्रीय गतिरोधकाची उंची जास्त असते. त्यामुळे मागचे चाक त्यावरून उतरताना आपटले जाते. त्यामुळे मणक्‍याच्या चकत्यांना इजा होण्याची शक्‍यता असते.’’

संचेती रुग्णालयातील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. केतन खुर्जेकर म्हणाले, ‘‘रम्बलरमुळे मणक्‍याचा त्रास निश्‍चितपणे वाढू शकतो. मणक्‍यातील चकती अंशतः सरकलेली असते. त्याला कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज नसते. पण वारंवार अशा रस्त्यावरून प्रवास केल्याने चकत्यांवर ताण येतो. त्यातून त्रास वाढतो.’’

लोकमान्य रुग्णालयाचे डॉ. नरेंद्र वैद्य म्हणाले, ‘‘गतिरोधक हा प्रकार धोकादायकच आहे. दुचाकीस्वारांसाठी त्यातून धोका वाढतो. पाठीचा मणका आणि मानेचा विकार वाढण्याची शक्‍यता असते. कारण गतिरोधकाच्या धक्‍क्‍याने शरीराच्या वजनापेक्षा पाच ते सहा पट जास्त आघात मणक्‍यावर होत असतो.’’

डॉक्‍टर म्हणतात...
रम्बलरवरून सातत्याने प्रवास झाल्यास चकत्या सैल होण्याचा धोका. त्यातून पाय, टाच आणि कंबरदुखी
मणक्‍याचे दुखणे रम्बलरमुळे आणखी वाढण्याचा धोका
अशास्त्रीय गतिरोधकामुळे पाठीचा मणका आणि मानेचा विकार वाढण्याची शक्‍यता
गतिरोधकाच्या धक्‍क्‍याने शरीराच्या वजनापेक्षा पाच ते सहा पट आघात मणक्‍यावर होतो
वयाच्या साठीत जाणवणारा त्रास, रम्बलरमुळे अगदी पस्तिशीतच बळावू लागला आहे.
 

एक कोन चुकला तरी विकार
‘‘गतिरोधकाची रचना, गतिरोधकावरून जाताना वाहनाचा वेग, वाहनचालकाची शारीरिक तंदुरुस्ती आणि वाहनाची स्थिती हे चारही कोन व्यवस्थित असतील तर मणका लवकर खिळखिळा होणार नाही. यातील एक कोन जरी चुकला तरीही पाठीचा विकार होण्याची स्थिती २५ टक्‍क्‍यांनी वाढते.’’
- डॉ. सचिश्‍चंद्र गोरे 

Web Title: speed breaker rumbler