विमानाला विलंब झाल्याने प्रवाशांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 एप्रिल 2019

मतदान हुकले
स्पाइसजेटच्या पुण्यावरून दुबईला जाणाऱ्या विमानाला विलंब झाल्याने दुबईवरून पुण्यासाठी येणाऱ्या विमानालाही (एसजी ५२) पंधरा तास उशीर झाला. हे विमान रविवारी रात्री ११ वाजता पुण्यासाठी उड्डाण करणार होते. मात्र, दुबईला जाणाऱ्या विमानास उशीर झाला. त्यामुळे या विमानाने पंधरा तास उशिराने सोमवारी दुपारी तीन वाजता पुण्यासाठी उड्डाण केले. दुबई विमानतळावरून पुण्यासाठी येणाऱ्या विमानास उशीर झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. काही प्रवासी मतदानासाठी पुण्याला येत होते. मात्र, उशीर झाल्याने त्यांना मतदान करता आले नाही, असे या विमानाने प्रवास केलेल्या लक्ष्मीनारायण पांडे यांनी सांगितले.

स्पाइसजेटच्या उड्डाणाला तब्बल साडेचौदा तास उशीर
पुणे - पुण्याहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या (एसजी ५१) विमानाला तब्बल साडेचौदा तास उशीर झाल्याने प्रवाशांना रात्र विमानतळावरच काढावी लागली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे वृद्ध, महिला आणि लहान मुलांचे अतोनात हाल झाले. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त करत, विमानतळावर कंपनीविरोधात घोषणाबाजी केली. 

‘स्पाइसजेट’चे दुबईला जाणारे विमान नियोजित वेळेनुसार रविवारी रात्री आठ वाजता िनघून दहा वाजता दुबईला पोचणे अपेक्षित होते. मात्र, रविवारी हे विमान तीन तासांच्या विलंबाने रात्री ११ वाजता निघणार असल्याचे कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले. विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रत्यक्षात हे विमान सोमवारी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी निघून, दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी दुबईला पोचले. दरम्यान, रविवारी रात्री ११ वाजता विमान उड्डाणासाठी सज्ज झाले होते. विमानांमध्ये १८६ प्रवासी होते. विमान कंपनीने प्रवाशांना बोर्डिंग पास देऊन विमानात बसविले. मात्र, त्यानंतर विमान न निघाल्याने प्रवाशांना सुमारे चार तास विमानातच बसून ठेवले. पहाटे तीन वाजता प्रवाशांना विमानातून उतरवून पुन्हा टर्मिनन्समध्ये आणण्यात आले.

या काळात कंपनीकडून काहीही व्यवस्था करण्यात आली नाही, असा आरोप प्रवाशांनी केला. चौदा तासांच्या विलंबामुळे पुढील नियोजन बारगळल्याने प्रवासी संतप्त झाले होते. दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे ‘एसजी-५१’ या विमानाला उशिर झाल्याचे सांगत प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल कंपनीने प्रवाशांची माफी मागितली.

Web Title: Spicejet Plane Late Passenger Problem