क्रीडा दिनाला ‘तंदुरुस्त भारत’ची जोड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस- राष्ट्रीय क्रीडा दिन- आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यंदाच्या क्रीडा दिनाला पंतप्रधानांनी हाक दिलेल्या ‘तंदुरुस्त भारत’ योजनेची जोड मिळाली.

पुणे - हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस- राष्ट्रीय क्रीडा दिन- आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यंदाच्या क्रीडा दिनाला पंतप्रधानांनी हाक दिलेल्या ‘तंदुरुस्त भारत’ योजनेची जोड मिळाली. अनेक शाळा, महाविद्यालयांनी या दिवशी तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून देताना विद्यार्थ्यांना तंदुरुस्त राहण्याची शपथ दिली. 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटनेच्या वतीने पूना कॉलेजच्या मैदानवार राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर या वेळी ‘तंदुरुस्त भारत’ची शपथही घेण्यात आली. कार्यक्रमात पूना कॉलेज, क्रिसेंट हायस्कूल, माउंट कार्मेल प्रशाला, सरदार दस्तूर प्रशाला, मोलेदिना प्रशाला, अँग्लो उर्दू प्रशाला, कॅम्प एज्युकेशन प्रशाला, नेस वाडिया कनिष्ठ महाविद्यालय, अंजुमन इस्लाम हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. 

चालण्याचा उपक्रम 
 पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबूरावजी घोलप महाविद्यालयात फिट इंडिया अभियान राबवण्यात आले. यात महाविद्यालयाच्या जॉगिंग ट्रॅकवर दहा हजार पावले चालण्याचा उपक्रम घेण्यात आला. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना तंदुरुस्त भारत उपक्रमाची माहिती देण्यात आली. 

त्याचबरोबर शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी मार्गदर्शन केले. उपक्रमाचे नियोजन महाविद्यालयातील शरीरिक शिक्षण संचालिका प्रा. विद्या पाठारे यांनी केले.

ऑलिंपिक पदकाचे पूजन
बावधन येथील चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल शाळेतही क्रीडा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. या वेळी केलेले ऑलिंपिक पदक पूजन विशेष ठरले. या वेळी जिम्नॅस्टिक प्रशिक्षक अजित जरांडे, कबड्डी संघटन मोहन भावसार, मुख्याध्यापिका रोहिणी कुल्हाली आदी उपस्थित होते. या वेळी १९३६ मध्ये ऑलिंपिक हॉकी सुवर्णपदक विजेत्या संघातीला खेळाडू दिवंगत बाबू निमल यांना मिळालेले सुवर्णपदक त्यांच्या कुटुंबीयांनी पूजनासाठी दिले होते. 

मैत्रीपूर्ण लढती
स. प. महाविद्यालयातही क्रीडा दिनाला ‘तंदुरुस्त भारत’ योजनेची जोड देण्यात आली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. दिलीप शेठ, महाविद्यालय क्रीडा संचालक रणजित चामले यांच्यासह पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. या वेळी महाविद्यालयातील कर्मचारी आणि पत्रकार यांच्यात क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्हॉलिबॉल अशा विविध खेळांचे सामने खेळण्यात आले. तंदुरुस्तीची शपथही घेण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sports Day celebration in college