एसटी महामंडळाच्याही आता "ई-बस' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

पुण्यापासून सोलापूर, नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापूर या मार्गांवर एसटीच्या ई-बस अल्पावधीत धावणार आहेत. पुणे विभागीय कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. 

पुणे - शहरात "पीएमपी'च्या ई-बसला मिळत असलेली लोकप्रियता बघून एसटीनेही हा कित्ता गिरविण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यापासून सोलापूर, नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापूर या मार्गांवर एसटीच्या ई-बस अल्पावधीत धावणार आहेत. पुणे विभागीय कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात सर्वाधिक ई-बस पीएमपीच्या ताफ्यात आहेत. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटी महामंडळानेही आता ई-बस वापरण्याचे ठरविले आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या सध्या सुमारे 20 हजार बस आहेत. 50 ई-बस पुण्यापासून सुमारे 250 किलोमीटरच्या अंतरावरील मार्गांवर धावतील. कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि सोलापूरच्या एसटीचे अधिकारी पुण्यात आले होते. त्यांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती पुणे विभागाच्या नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली. 

पितृछत्र हरपले; आईची मृत्यूशी झुंज

स्वारगेट आगारात आता ई-बससाठी चाजिंग स्टेशन बसविण्यात येणार आहे; तर चारही मार्गांवर त्या-त्या ठिकाणच्या एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयांच्या अखत्यारित असलेल्या आगारांत चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. एकदा चार्जिंग झाल्यावर बस सुमारे 225 ते 250 किलोमीटर धावू शकते. त्यामुळे चार्जिंग करून बस परत येऊ शकते. तीन महिन्यांत याबाबतची प्रक्रिया पूर्ण होईल. 

"शिवाई' नामकरण... 
एसटी महामंडळातर्फे नव्याने सुरू होणाऱ्या ई-बसला "शिवाई' नाव देण्याचाही निर्णय या बैठकीत झाला. या बस वातानुकूल असतील. कोणतीही दरवाढ न करता प्रवाशांना या बसचा वापर करता येईल. यापूर्वी "शिवनेरी' आणि "शिवशाही' बस एसटीच्या ताफ्यात आहेत. आता "शिवाई'चाही समावेश झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST corporation now has e-bus