#STPassIssue एसटी तिकिटात सवलत मिळेना (व्हिडिअो)

ST-Pass-Issue
ST-Pass-Issue

पुणे - राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वरून ६० केले आहे. मात्र, ही घोषणा होऊन चार महिने उलटले, तरीदेखील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात तिकीट आकारणी केली जात नाही. त्यामुळे ६० ते ६५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांसाठी विधानसभेत धोरण जाहीर केले. यानुसार सर्व योजनांच्या लाभासाठी ज्येष्ठांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षे केली आहे. त्यानुसार ६० वर्षांवरील ज्येष्ठांना एसटीच्या तिकिटामध्ये सवलती मिळणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडून कोणताही अध्यादेश (जीआर) काढण्यात आलेला नाही. त्यामुळे ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीमध्ये सवलती मिळत नसल्याने प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होत आहे.

ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० करण्यात आली असली, तरीदेखील याबाबतचा आदेश एसटी प्रशासनाला मिळाला नाही. यासाठी आवश्‍यक अध्यादेशही (जीआर) अद्याप काढण्यात आला नाही. त्यामुळे ६० वर्षांवरील नागरिकांना तिकिटामध्ये सवलती देता येत नाहीत.
- एस. एस. शिंदे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, स्वारगेट विभाग

मी कामानिमित्त पुण्याला राहतो. वर्षातून ५-६ वेळेस एसटी बसने प्रवास करतो. शासनाने ज्येष्ठांची वयोमर्यादा कमी करण्याचा निर्णय घेऊनही मला तिकिटामध्ये कोणत्याही प्रकारची सवलत मिळत नाही. सरकारने या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी.
- सदाशिव नटवे, प्रवासी, उस्मानाबाद

रेल्वेमध्ये आम्हाला तिकिटात सवलत मिळते; पण एसटीमध्ये मिळत नाही. याबाबतचा निर्णय होऊन ३-४ महिने झाली, तरीदेखील एसटीमध्ये सवलत का दिली जात नाही. सरकारने यावर लवकर निर्णय घेऊन आम्हा ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या तिकिटामध्ये सवलत द्यावी. 
- इंदूबाई सावंत, प्रवासी, सांगली.

मी अनेकदा एसटी बसने प्रवास करते. ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा कमी केल्याची माहिती मिळाली. मात्र, सरकारच्या या निर्णयानंतरही तिकिटात सवलत मिळत नाही, प्रवासी तिकिटाचा पूर्ण दर आकारला जात असल्याने शासनाने यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी माझी शासनाला विनंती आहे.
- शकुंतला क्षीरसागर, प्रवासी, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com