'हिरकणी कक्षा'ला महिलांचा प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

हिरकणी कक्षाची रोज साफसफाई करण्यात येते. येथे योग्य ती सुविधा उपलब्ध केली आहे. या योजनेची माहिती महिलांना व्हावी म्हणून कक्षाच्या बाहेर तान्हुल्या बाळाला माता स्तनपान करतानाचे चित्र लावले आहे.'' 
- अशोक जौजाळ, वाहतूक नियंत्रक, पुणे रेल्वे एसटी स्थानक

पुणे : बाळाला स्तनपान करता यावे, यासाठी राज्यातील प्रत्येक एसटी स्थानकावर 'हिरकणी कक्षा'ची स्थापना करण्यात आली. या योजनेला पुण्यातील तिन्ही एसटी स्थानकांवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्थानक आणि स्वारगेट येथील एसटी बस स्थानकावरील हिरकणी कक्षाचा वापर वाढला असून, महिलांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. 

पुणे रेल्वे स्थानक आणि शिवाजीनगर येथील एसटी स्थानकावरील 'हिरकणी कक्ष' चोवीस तास सुरू असतो. स्वारगेट स्थानकावर नव्याने 'हिरकणी कक्ष' उभारण्यात येणार असून, सध्या एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी असलेला विश्रांतीगृह महिलांसाठी उपलब्ध करून दिला आहे. शिवाजीनगर आणि पुणे रेल्वे स्थानकाच्या 'हिरकणी कक्षा'त बसण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. पुणे रेल्वे स्थानकावरील कक्षाची व्यवस्थाही चांगली असल्याचे 'सकाळ'च्या वतीने केलेल्या पाहणीत आढळले. 

या तिन्ही स्थानकांवर महिला प्रवाशांची रोज गर्दी असते. त्यात तान्हुल्या बाळांसह प्रवास करणाऱ्या महिलांचे प्रमाणही मोठे आहे. अशा महिलांना बाळाला स्तनपान करता यावे, यासाठी राज्यातील प्रत्येक एसटी स्थानकावर 'हिरकणी कक्षा'ची स्थापना केली आहे. या योजनेला महिलांकडून सुरवातीला प्रतिसाद मिळत नव्हता; पण प्रचारानंतर आता त्याचा वापर वाढला आहे. 

स्वारगेट एसटी स्थानकावरील एक अधिकाऱ्याने सांगितले, की स्वारगेट स्थानकावर हिरकणी कक्षाची नव्याने उभारणी करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत त्याचे काम पूर्ण होईल. 

रोज किमान दोन ते तीन महिला कक्षाचा वापर करत आहेत. कार्यालयातून परवानगी घेतल्यानंतर महिलांसाठी हा कक्ष उपलब्ध करून दिला जातो. 
- सागर गाडे, सहायक वाहतूक नियंत्रक, शिवाजीनगर स्थानक 

Web Title: ST starts Hirkani service for women