शहरातील एसटी स्थानकांना खासगी वाहनांचा विळखा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

बसस्थानकात बेशिस्त धावणाऱ्या दुचाक्‍या, स्थानकाच्या प्रवेशद्वारावर विळखा घातलेल्या रिक्षा, खासगी बस, स्थानकात आलेली खासगी वाहने, त्यातून झालेली कोंडी आणि या कोंडीतून बस शोधणारे प्रवासी... हे चित्र शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन बस स्थानकांचे आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या तिन्ही एसटी बस स्थानकाला खासगी वाहतुकीचा विळखा पडल्याचे पाहणीत दिसून येते.

पुणे - बसस्थानकात बेशिस्त धावणाऱ्या दुचाक्‍या, स्थानकाच्या प्रवेशद्वारावर विळखा घातलेल्या रिक्षा, खासगी बस, स्थानकात आलेली खासगी वाहने, त्यातून झालेली कोंडी आणि या कोंडीतून बस शोधणारे प्रवासी... हे चित्र शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन बस स्थानकांचे आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या तिन्ही एसटी बस स्थानकाला खासगी वाहतुकीचा विळखा पडल्याचे पाहणीत दिसून येते.

शहरामध्ये राज्यभरातील लाखो प्रवासी रोज ये-जा करत असतात. या प्रवाशांच्या तुलनेत बस स्थानकावर सोयीसुविधा नसल्याने प्रवाशांची 
गैरसोय होत असतानाच स्थानकातील खासगी वाहनांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकी, रिक्षा, कार, टेम्पो ही वाहने बेकायदेशीररीत्या स्थानकामध्ये फिरतात तर, स्थानकाच्या प्रवेशद्वारावर खासगी ट्रॅव्हल उभ्या असतात. त्यामुळे स्थानक परिसरामध्ये सतत वाहतूक कोंडी होत असते. खासगी वाहनाबाबत एसटी प्रशासनाने वाहतूक पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने ही खासगी वाहने स्थानकामध्ये येत असल्याचे एसटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. नातेवाइकांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी दुचाकी, कार स्थानकामध्ये येतात. तर, प्रवाशांना पळविण्यासाठी रिक्षाचालक स्थानकामध्ये रिक्षा आणतात. तसेच स्थानकाबाहेर ट्रॅव्हल्स प्रवासी पळवितात. अशा वाहनांवर कारवाईचा अधिकार एसटी प्रशासनाला नसल्याने त्यांना स्थानिक पोलिसांकडे याबाबत तक्रार द्यावी लागते. अशा तक्रारी करण्याचे प्रमाण फारच कमी आहे. त्यातही प्राप्त तक्रारीवर कारवाईचे प्रमाण तर नगण्यच आहे, त्यामुळे खासगी वाहतूकदारांना कारवाईची कसलीच भीती राहिलेली नाही. 

दोनशे मीटरपर्यंत बंदी 
एसटी बस स्थानकाच्या दोनशे मीटर परिघामध्ये खासगी वाहनांना उच्च न्यायालयाने बंदी घातलेली आहे. दोनशे मीटरच्या परिसरामध्ये खासगी वाहतुकीस बंदी असूनही ती होत असेल तर, संबंधितावर दंडात्मक कारवाईचा अधिकार न्यायालयाने स्थानिक पोलिसांना दिलेला आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन पोलिसांकडून होत नसल्याचे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे. 

स्थानकामध्ये खासगी वाहने मोठ्या प्रमाणात येतात. त्याचा त्रास प्रवाशांसह प्रशासनास होतो. स्थानकात येणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. स्थानकातून प्रवासी पळविल्याने एसटीचा महसूल बुडत आहे. 
- अशोक अघाव, स्थानक प्रमुख, स्वारगेट बस स्थानक 

 

Web Title: St Stop Shivajinagar Swargate Private Vehicle Traffic