बारामती - वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी पावले उचलण्यास प्रारंभ

मिलिंद संगई
गुरुवार, 29 मार्च 2018

बारामती : नगरपालिकेने वीजबिलात काटकसर करुन आगामी काळात वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. सौरउर्जा प्रकल्पाद्वारे वीजबिलात बचत करुन हा पैसा विकासकामांसाठी वापरण्यासाठी एक प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु असल्याची माहिती गटनेते सचिन सातव यांनी दिली. 

बारामती नगरपालिकेकडून सध्या पथदिवे, प्रशासकीय इमारत, जलशुध्दीकरण केंद्र, व इतर ठिकाणचे मिळून जवळपास सरासरी 30 लाख रुपये वीजबिल दर महिन्याला भरले जाते. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणानुसार आता सौरउर्जा प्रकल्प बसवून त्याची वीज ग्रीडमध्ये सोडल्यास नगरपालिकेकडून तयारी होणारी वीज व त्यांनी महावितरणची वापरलेली वीज यांचा ताळमेळ घालून उर्वरित वीजेच्या वापराचेच पैसे फक्त नगरपालिकेला भरावे लागतील. 

या मध्ये तज्ज्ञांच्या अंदाजानुसार तीन वर्षानंतर सौर उर्जा प्रकल्पाचा खर्च निघून गेला तर नगरपालिकेचा वीजबिलाचा खर्च पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतो, त्या मुळे वर्षाचे जवळपास तीन कोटी रुपये नगरपालिकेची बचत होईल, असे सातव म्हणाले. 

नगरपालिकेच्या इमारतींवर सौरउर्जा प्रकल्पाचे पॅनेल बसवून त्या पासून तयार झालेली वीज महावितरणच्या ग्रीडमध्ये सोडण्याच्या दृष्टीने प्रकल्प अहवाल तयार करण्यास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हिरवा कंदील दाखविला आहे, काळाची गरज विचारात घेता अपारंपरिक उर्जास्त्रोतांचा वापर वाढवून खर्च कमी करण्याच्या दृष्टीने नगरपालिकेचा प्रयत्न सुरु आहे. या साठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरु असून आवश्यक बाबींची पूर्तता करुन लवकर हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न आहे. 

Web Title: Start taking steps to reduce the bill of electricity