'सकाळ रिलिफ फंड'च्या माध्यमातून बळपुडी ओढा खोली कामास सुरवात

डॉ. संदेश शहा
बुधवार, 6 जून 2018

इंदापूर तालुक्यातील बळपुडी या टंचाईप्रवण गावात सकाळ रिलिफ फंड, सकाळ तनिष्का बळपुडी, बळपुडी ग्रामस्थ तसेच आरोग्य संदेश प्रतिष्ठानच्या वतीने बळपुडी ओढा खोली 
करण्यास सुरवात करण्यात आली.

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बळपुडी या टंचाईप्रवण गावात सकाळ रिलिफ फंड, सकाळ तनिष्का बळपुडी, बळपुडी ग्रामस्थ तसेच आरोग्य संदेश प्रतिष्ठानच्या वतीने बळपुडी ओढा खोली 
करण्यास सुरवात करण्यात आली. सरपंच तथा तनिष्का गट प्रमुख राजश्री लहू गाढवे, तनिष्का समन्वयक डॉ. राधिका शहा, लोणी देवकर विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष 
प्रताप गाढवे, सोसायटीचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चोरमले, ज्येष्ठ नागरिक बिरूदेव खताळ, संदिपान गाढवे यांच्या हस्ते नारळ फोडून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. 

सरपंच गाढवे म्हणाल्या, बळपुडी या गावात 40 टक्के वनविभाग असून शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र 60 टक्के शेती व्यवसाय हा पावसाळ्यातील पाण्यावर अवलंबून 
असून उन्हाळ्यात पाणी टंचाईस तोंड द्यावे लागते. काही शेतकऱ्यांनी 7 किलोमीटर अंतरावरून उजनी पाणलोट क्षेत्रातून पाईपलाईन केली आहे. त्यामुळे गावातील 20 टक्के लोकांना 
पाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे गावाची पाणी टंचाई दूर करण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'चे सहकार्य लाभल्याने गावाची पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. 

सोसायटीचे अध्यक्ष प्रताप गाढवे म्हणाले, या उपक्रमात गावातील आम्ही सर्वजण सहभागी झालो असून ग्रामस्थ ओढ्यातील काढलेला गाळ काढण्यासाठी ट्रॅक्टर देत आहेत. त्यामुळे ओढा खोलीकरण व रूंदीकरणामुळे पावसाचे पडणारे पाणी साचून गावचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. सकाळ रिलीफ फंडाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. डॉ. राधिका शहा म्हणाल्या, सकाळ तनिष्काचे पुणे जिल्हा संपादक डी. आर. कुलकर्णी तसेच सहकारी सागर गिरमे यांनी ग्रामस्थांसमवेत ओढ्याची पाहणी करून ओढाखोलीकरणाचे नियोजन केले आहे. दहा दिवसात हे काम संपवण्याचा संकल्प आहे. यावेळी तनिष्काच्या माध्यमातून गावात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक बळपुडीचे माजी उपसरपंच लहू गाढवे यांनी तर सूत्रसंचालन ग्रामसेवक अजित
बनसोडे यांनी केले. आभार प्रदर्शन संदिपान चोरमले यांनी केले. यावेळी अशोक गाढवे, सुभाष गाढवे, सुषमा गाढवे, निता काळेल, छाया चोरमले, सिंधू गाढवे उपस्थित होते.
 

Web Title: Start work with the help of Sakal Relief Fund and villagers