मच्छरदाणी आंदोलनाला यश, जलपर्णी काढण्यास सुरवात

कृष्णकांत कोबल
बुधवार, 2 मे 2018

मांजरी (पुणे) : येथील मुळा-मुठा नदीवर पसरलेली जलपर्णी काढण्यासाठी झालेल्या मच्छरदाणी आंदोलनाला यश आले आहे. महानगरपालिकेने ही जलपर्णी काढण्यासाठी पुढाकार घेतला असून स्पायडरमॅन वाहन लावून ती काढण्याच्या कामास सुरुवातही करण्यात आली आहे.

मांजरी (पुणे) : येथील मुळा-मुठा नदीवर पसरलेली जलपर्णी काढण्यासाठी झालेल्या मच्छरदाणी आंदोलनाला यश आले आहे. महानगरपालिकेने ही जलपर्णी काढण्यासाठी पुढाकार घेतला असून स्पायडरमॅन वाहन लावून ती काढण्याच्या कामास सुरुवातही करण्यात आली आहे.

मुंढवा-खराडी ते मांजरी परिसरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदी पात्रावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्याने काठावरील नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. अर्ज विनंती करुनही कोणत्याही प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यामुळे येथील आखिल मांजराईनगर नागरिक कृती समितीच्या वतीने नदी काठावर मच्छरदाणी आंदोलन केले होते.

या आंदोलनाची दखल घेऊन पालिका व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी हा प्रश्न कसा सोडवता येईल, या दृष्टिकोनातून पाहणी करून दुसऱ्या दिवशी पालिकेतील सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी तातडीने त्यासाठी स्पायडरमॅन वाहन पाठवून  लगेचच जलपर्णी काढण्याच्या कामास सुरुवात केली आहे. नागरिक कृती समितीचे कार्यकर्ते त्यासाठी सहकार्य करीत आहेत. स्थानिक नावाड्यांच्या साह्याने जलपर्णी कापून मोकळी केली जात आहे. 

पालिकेतील समन्वय अधिकारी शाम माने, मांजरी बुद्रुकचे ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार, मांजरी खुर्दचे ग्रामविकास अधिकारी एम. पी. चव्हाण यावेळी उपस्थित होते.

समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे म्हणाले, "हा प्रश्न ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम करणारा असल्याने महत्वाचा आहे. ग्रामपंचायतने मात्र त्याबाबत उदासीनता दाखविली आहे. पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून संपूर्ण जलपर्णी काढून टाकली जाणार आहे. समितीचे सदस्यही त्यासाठी सहकार्य करतील.'' 

"जलपर्णी काढण्याच्या कामाला पंधरा वीस दिवस लागणार आहेत. या काळात काही वेळा पुलावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. प्रवासी व ग्रामस्थांनी त्याबात सहकार्य करणे अपेक्षीत आहे. संपूर्ण जलपर्णी काढूनच काम थांबविण्यात येईल.''

- डॉ. कल्पना बळीवंत  
सहाय्यक आरोग्य अधिकारी, महानगरपालिका

Web Title: starting work for removing jalparni