'अहाम्युन' आणि 'सिंथेरा' या स्टार्टअप्सना पारितोषिक प्रदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

'अहाम्युन बायोसायन्सेस' या स्टार्टअपची स्थापना डॉ. परुल गांजू आणि डॉ. कृष्णमूर्ती नटराजन यांनी मे 2016 मध्ये केली. 'व्हिटिलिगो' नावाच्या त्वचारोगावर औषध संशोधनाचे काम 'अहाम्युन' करत आहे.

पुणे : राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेच्या 'व्हेन्चर सेंटर' या विज्ञानाधारित स्टार्टअप इन्क्‍युबेटरमधील 'अहाम्युन बायोसायन्सेस' आणि 'सिंथेरा बायोमेडिकल' या दोन स्टार्टअप्सना बंगळूरमधील 'स्टार्टअप बायो-2017' कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

जैवतंत्रज्ञान आणि वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्स, बहुराष्ट्रीय कंपन्या, गुंतवणूकदार, वित्त आणि व्यवसाय तज्ज्ञ यात सहभागी झाले होते. 'बॅंगलोर बायो-इनोव्हेशन सेंटर' आणि 'इन्स्टिट्यूट ऑफ बायो-इन्फॉर्मेटिक्‍स अँड अप्लाईड बायोटेक्‍नॉलॉजी' यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
'अहाम्युन बायोसायन्सेस' या स्टार्टअपची स्थापना डॉ. परुल गांजू आणि डॉ. कृष्णमूर्ती नटराजन यांनी मे 2016 मध्ये केली. 'व्हिटिलिगो' नावाच्या त्वचारोगावर औषध संशोधनाचे काम 'अहाम्युन' करत आहे. 'पिच फेस्ट' कार्यक्रमात 'स्मॉल मॉलिक्‍यूल्स', बायोलॉजिक्‍स आणि बायोटेक या विभागामध्ये 'अहाम्युन'ला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

'सिंथेरा बायोमेडिकल' या स्टार्टअपची स्थापना फेब्रुवारी 2015 मध्ये डॉ. नीलय लाखकर यांनी केली. ऑर्थोपेडिक आणि डेंटल क्षेत्रामध्ये परवडणाऱ्या बायोमटेरियलची निर्मिती करण्याचे काम या स्टार्टअपद्वारे केले जात आहे. पिच फेस्ट कार्यक्रमात वैद्यकीय तंत्रज्ञान आणि डायग्नॉस्टिक विभागात 'सिंथेरा'ला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. प्रमाणपत्र आणि एक लाख रुपये असे या पारितोषिकांचे स्वरूप आहे. बायोकॉन कंपनीच्या अध्यक्षा किरण मजुमदार शॉ यांच्या हस्ते या दोन्ही स्टार्टअप्सना पारितोषिक प्रदान करण्यात आले.

Web Title: startups awards to ncl projects