स्टार्टअपची पसंती को-वर्किंग स्पेसला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Startup

गेल्या चार वर्षांत शहरात स्टार्टअपची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यासह अनेक लहान कंपन्यादेखील पुण्यात स्थापन होत आहेत.

स्टार्टअपची पसंती को-वर्किंग स्पेसला

पुणे - नवीन ऑफिस (New Office) घेऊन त्यात कामकाज करणे हे प्राथमिक स्तरावर शक्य नसते. तसेच, ऑफिसचे भाडे (Office Rent) आणि कामगारांचा पगार (Worker Salary) यांचा मेळ घालण्यातही नव्याने व्यवसाय (Business) सुरू केलेल्यांची दमछाक होते. त्यामुळे कमी खर्चात आपल्या व्यवसाय सुरू व्हावा, म्हणून आजही अनेक स्टार्टअपची (Startup) पसंती को-वर्किंग स्पेसला (Co-Working Space) आहे.

गेल्या चार वर्षांत शहरात स्टार्टअपची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यासह अनेक लहान कंपन्यादेखील पुण्यात स्थापन होत आहेत. यातील अनेक कंपन्यांना स्वतःची ऑफिस स्पेस घेणे शक्य होत नाही. भांडवलाची कमतरता, किती कर्मचारी असतील याची निश्‍चिती नाही, तसेच व्यवसाय सुरळीत चालला नाही तर काय? असे अनेक प्रश्‍न त्यांच्यापुढे असतात. त्यामुळे कमी खर्चात व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी को-वर्किंग स्पेसला प्राधान्य मिळत आहे. त्यामुळे अशा जागा चालविणाऱ्यांची संख्याही शहरात वाढली आहे. आयटी क्षेत्राच्या कंपन्या असलेल्या भागांत हे को-वर्किंग स्पेस सुरू होण्याचे प्रमाण जास्त आहे.

हे आहेत फायदे

 • भाडे कमी असते

 • विविध सुविधा मिळतात

 • ऑफिसमधील इंटेरियर भन्नाट असते

 • आवडेल असे वर्क कल्चर

 • देखभाल दुरुस्ती वेळच्यावेळी केली जाते

या क्षेत्रांमध्ये वापर

 • विविध क्षेत्रांतील लहान उद्योग

 • आयटी कंपन्या

 • विपणन आणि विक्रीसंदर्भातील कंपन्या

 • विविध स्टार्टअप

 • बड्या कंपन्यांचे ग्राहक सेवा विभाग

 • वैयक्तिकरीत्या काम करणारे व्यावसायिक

आमची कंपनी गेल्या तीन वर्षांपासून शिवाजीनगरमधील एका को-वर्किंग स्पेसमध्ये कार्यरत आहे. अगदी बड्या कंपन्यांत मिळाव्यात अशा सुविधा, ऑफिसमधील इंटेरियर, वर्क कल्चर यामुळे येथेच काम करायला चांगले वाटते. तसेच, पैशांचीही बचत होते. सध्या माझ्यासह आमचे सहा कर्मचारी एकाच को-वर्किंग स्पेसमध्ये कार्यरत आहोत. यापुढेही काही वर्षे येथेच थांबण्याचा विचार आहे.

- राजेश ठोसर, आयटी कंपनीचे संस्थापक

को-वर्किंग स्पेसमध्ये येणाऱ्यांची संख्या मार्चनंतर काही प्रमाणात वाढली आहे. सर्व क्षेत्रं पूर्णपणे खुली झाल्याने ही वाढ दिसते. याठिकाणी येणारे केवळ लघू व्यावसायिकच नाही, तर बड्या कंपन्याही आहेत. अचानक वाढलेल्या मनुष्यबळासाठी या जागांचा वापर केला जात आहे.

- अजित घोगरे, भागीदार, अस्टर को-वर्किंग स्पेस

टॅग्स :Startuppune