हर्षवर्धन पाटील यांनी विश्रांती घ्यावी; राज्यमंत्र्यांची नाव न घेता टीका

डॉ. संदेश शहा
Sunday, 21 June 2020

इंदापूर तालुक्यातील गोखळी परिसरात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटाव मोहिम राबविल्यानंतर कारवाईत नुकसान झालेल्या ग्रामस्थांसमवेत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पाहणी केली.

इंदापूर : "तालुक्यातील सर्वसामान्य जनतेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. त्यामुळे विरोधकांनी राजकारण न करता सर्वसामान्यांनी दिलेला कौल मानून विश्रांती घ्यावी," अशी टीका वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली. त्यामुळे भरणे व पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.                     

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

इंदापूर तालुक्यातील गोखळी परिसरात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटाव मोहिम राबविल्यानंतर कारवाईत नुकसान झालेल्या ग्रामस्थांसमवेत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पायी चालत पाहणी केली. यावेळी गावातील श्री भैरवनाथ मंदिरात सुटीच्या दिवशी वनविभाग अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, प्रमुख पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन कागदपत्रे पाहत बाधित ग्रामस्थांची मते जाणून घेतली. यापुढील काळात आपण स्वतः लक्ष घालून एकत्रित बैठक घेऊन सर्वानूमते निर्णय घेतला जाईल, जनतेचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. तसेच, जनतेच्या हितासाठी सत्तेत असो किंवा नसो सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही भरणे यांनी दिली.

- पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापुढे राहणार हवेलीकरांचे वर्चस्व; वाचा सविस्तर बातमी

पुढे भरणे म्हणाले, की तालुक्यात विरोधकांनी राजकारण न करता जनतेने दिलेला कौल मानून पाच वर्षे विश्रांती घेतली पाहिजे. त्यांनी सत्तेत असताना हा प्रश्न कायमचा का सोडविला नाही, असा सवाल त्यांनी केला. जनतेच्या सर्वोच्च हितासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे ते म्हणाले. यावेळी भरणे यांच्या हस्ते नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, गोखळी सरपंच बापु पोळ, ग्रामपंचायत सदस्य सचिन तरंगे, बाळासाहेब हरणावळ, सचिन वाघमोडे उपस्थित होते.

- काय सांगता? एका महिलेमुळं इंदापूरातील सहा गावे बफर झोनमध्ये!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state forest minister dattatrey bharane inspected the gokhali indapur