खेडमध्ये संपाला शंभर टक्के प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

राजगुरुनगर - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज खेड तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला. त्यामुळे तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बंद राहिल्या व संपाची तीव्रता वाढली. शिक्षक संघटनांनी खेड पंचायत समितीसमोर आंदोलन केले. 

राजगुरुनगर - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज खेड तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला. त्यामुळे तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बंद राहिल्या व संपाची तीव्रता वाढली. शिक्षक संघटनांनी खेड पंचायत समितीसमोर आंदोलन केले. 

राज्यात मंगळवारपासून सुरू असलेल्या संपात तालुक्‍यातील महसूल खात्याचे कर्मचारी सहभागी झाले होते. मात्र पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांपैकी फक्त ग्रामसेवक सहभागी झाले होते. त्यामुळे पंचायत समितीच्या १८९७ कर्मचाऱ्यांपैकी फक्त १३२ जण संपावर गेल्याचे दिसत होते. मात्र शिक्षक संघटनांच्या सहभागानंतर ही संख्या १४९० वर गेली आहे. सातवा वेतन आयोग आणि जुनी पेन्शन योजना ताबडतोब लागू करण्याची शिक्षक संघटनांची मागणी आहे. त्यांच्या मागण्यांचे निवेदन गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी आंदोलनस्थळी येऊन स्वीकारले. दरम्यान, महसूल विभागाचे सर्व कर्मचारी संपावर गेल्याने खेड उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी शुकशुकाट होता. सर्व तलाठी कार्यालये बंद होती. त्यामुळे लोकांचे हाल झाले. माध्यमिक विद्यालये व महाविद्यालयांचे अध्यापक प्राध्यापक संपात सहभागी झालेले नाहीत. मात्र महाविद्यालयांचे शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. पंचायत समितीचे लिपिक संपात सहभागी झालेले नाहीत. त्यांची आणि ग्रामसेवक व शिक्षक यांच्या वेतनश्रेणीत असलेली तफावत दूर करण्याची मागणी या मागण्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाही, म्हणून ते संपात सहभागी झालेले नाहीत.

Web Title: State Government Employee Strike