आपत्ती व्यवस्थापन विभागाला फटकारले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जुलै 2019

उजवा मुठा कालवा फुटून झालेली दुर्घटना आणि पाटील इस्टेटमधील आगीच्या घटनेदरम्यान या विभागातील अधिकारी वेळेत घटनास्थळी पोचले नसल्याचा ठपका राज्य सरकारने महापालिकेवर ठेवला आहे. कोंढवा आणि आंबेगावात सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतही महापालिकेच्या आपत्ती विभागाची कामगिरी समाधानकारक नसल्याच्या तक्रारी आहेत. 

पुणे -  आपत्तीच्या काळातच बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला राज्य सरकारनेही फटकारले. उजवा मुठा कालवा फुटून झालेली दुर्घटना आणि पाटील इस्टेटमधील आगीच्या घटनेदरम्यान या विभागातील अधिकारी वेळेत घटनास्थळी पोचले नसल्याचा ठपका राज्य सरकारने महापालिकेवर ठेवला आहे. कोंढवा आणि आंबेगावात सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतही महापालिकेच्या आपत्ती विभागाची कामगिरी समाधानकारक नसल्याच्या तक्रारी आहेत. 

या घटनांमधील दुर्घटनाग्रस्तांना तातडीच्या मदतीबरोबरच आर्थिक मदत केल्याचा दावा या विभागाच्या उपायुक्तांनी दिला. 

पावसाचा जोर वाढत असल्याने गेल्या काही दिवसांपासून शहर आणि उपनगरांत सीमाभिंती कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यात कोंढवा आणि आंबेगावात भिंत कोसळून 21 जणांचा जीव गेला. त्याचवेळी पुण्यात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्षम असेल, अशी आशा होती. नेमकी परिस्थिती उलट असून, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे कोणतीच यंत्रणा नसल्याचे उघडकीस आले. गेल्या तीन-चार वर्षांत या विभागाचा खर्च 33 कोटींच्या घरात गेला आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या कारभारावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. 

पर्वती पायथा येथील जनता वसाहतीत नोव्हेंबर 2018 मध्ये कालवा फुटून दीडशे घरांचे नुकसान झाले होते. अचानक घडलेल्या या घटनेत रहिवाशांचे प्रचंड नुकसान झाले. तेव्हा आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा वेळेत पोचून मदतीला येईल, अशी अपेक्षा लोकांची होती. या विभागाकडून फारसी मदत झाली नाही, अशी तक्रार नगरसेविका प्रिया गदादे यांनी केली होती. तसेच, शिवाजीनगरमधील पाटील इस्टेस्टमधील आगीच्या घटनेच्या वेळेत या विभागाचे कर्मचारी आणि अधिकारीच सोयीनुसार घटनास्थळी पोचल्याची नाराजी लोकांनी व्यक्त केली होती. त्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही त्याचे पडसाद उमटले होते.  या दोन्ही घटनांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने आपत्ती व्यवस्थापनाकडील यंत्रणा आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे. 

या दोन्ही घटनांमधील दुर्घटनाग्रस्तांना राज्य सरकारच्या आदेशानुसार मदत केली आहे.
- सुनील गायकवाड,  उपायुक्त आपत्ती व्यवस्थापन विभाग (तांत्रिक) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state government has blamed the Disaster Management Department for showing irresponsibility