सनातनबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी- हमीद

स्वप्नील जोगी - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 सप्टेंबर 2016

पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल होण्यास उशीर झाला, पण आता आरोपपत्र दाखल होणं हे तपासाला योग्य दिशेने नेणारे पाऊल म्हणता येईल. सनातन आणि हिंदू जनजागृती समिती यांच्याबाबत सरकारने आपली भूमिका आतातरी स्पष्ट करावी. अजूनही मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही, अशी मागणी डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे सनातन संस्थेच्याच सदस्यांचा हात असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज (बुधवार) दाखल केलेल्या आरोपपत्रांत म्हटले आहे. या आरोपपत्रात दाभोलकरांच्या हत्येमागे सनातनच्या साधकांचा हात असून, या प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. वीरेंद्र तावडे हा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. तर, विनय पवार आणि सारंग अकोलकर या सनातनच्या साधकांनी गोळ्या झाडल्याचे म्हटले आहे.

याविषयी बोलताना हमीद दाभोलकर म्हणाले, ‘‘गेली काही वर्षं आरोपींवर संशय होता, पण कारवाई झाली नव्हती त्यामुळे या हत्या ते घडवू शकले. या हत्या म्हणजे लोकशाहीवर हल्ले आहेत. राजकारणापलीकडे जात चौकशी व्हावी. या प्रकरणात गेल्या तीन वर्षांत झालेली ही महत्त्वाची घडामोड आहे. आजवर संशय होता, आज त्यापुढचे पाऊल पडले आहे. आरोपी वेळीच पकडले गेले असते, तर हत्या झाल्या नसत्या. आतातरी हे प्रकरण लवकरात लवकर चालवून त्यांना शिक्षा द्यावी. सीबीआय आणि एसआयटी एकाच निष्कर्षांपाशी येत जेव्हा आरोपपत्र दाखल करतात, तेव्हा याचा योग्य तो अर्थ आपण घेऊ शकतो. वेळीच योग्य कारवाई न झाल्यामुळे पानसरे आणि कलबुर्गी यांचे खून झाले. आता सीबीआय ने कार्यक्षमता दाखवून अधिक धागेदोरे खणून काढावेत. 29 सप्टेंबर रोजी असणारी उच्च न्यायालयाची सुनावणी लवकर घेता यावी असा आमचा प्रयत्न असेल. सारंग अकोलकर आणि विनय पवार अजूनही फरार आहेत. त्यांना मडगाव बॉम्ब स्फोटावेळी अटक झाली असती, तर सुधारकांच्या हत्या टळल्या असत्या. आम्ही समाधानी आहोत, असं मी म्हणणार नाही, पण एक छोटं पण महत्त्वाचं पाऊल नक्कीच आहे. अजूनही हत्यार आणि गाडीचा तपास बाकी आहे.‘‘

Web Title: State government should take a clear stand against Sanatan Sanstha