राज्यातील शाळांमध्ये ‘१०० दिवस वाचन अभियान’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Students Reading

राज्यातील शाळांमध्ये ‘१०० दिवस वाचन अभियान’

पुणे : विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांमधील जिज्ञासू, कल्पकता आणि सर्जनशीलता विकसित व्हावी यासाठी राज्यभरातील सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ‘१०० दिवसांकरिता वाचन अभियान’ राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी वाचन हे आनंददायी आणि उत्सुकता वाढविणारे व्हावे, यासाठी शाळांमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांच्या सहभागातून या अभियानांतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.

हेही वाचा: पुणे : विकासकामात लोकप्रतिनिधींनी पक्षविरहित असावे; रामदास आठवले

विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी, यासाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे राज्य सरकारच्या सहाय्याने हे अभियान राबविले जाणार आहे. त्यात बालवाटिका आणि इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. जानेवारी ते एप्रिल दरम्यान होणाऱ्या या अभियानांतर्गत वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील सर्व शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी आठवडानिहाय कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात वर्गातील वातावरण आनंददायी ठेवण्यासह विद्यार्थ्यांना शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तके उपलब्ध करून देणे, गोष्टींचा शनिवार, सगळे सोडा आणि वाचा (ड्रॉप एव्रिथिंग ॲण्ड रिड), माझी गोष्ट माझ्या भाषेत, असे उपक्रम या अभियानात आयोजित केले जाणार आहेत. यासाठी पालकांना मार्गदर्शन, वस्तीस्तरावर वाचनास प्रवृत्त करण्यासाठी कार्यक्रम, वाचन मेळावे, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा असे उपक्रम राबविले जातील. त्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा प्रशिक्षण आणि शिक्षण संस्था, जिल्हा परिषद, महापालिकेचा शिक्षण विभाग, अशा स्तरांवर उपक्रमांची जबाबदारी देण्यात आली आहे. हे अभियान एक जानेवारीपासून सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये राबविण्यात येत आहे.

हेही वाचा: बारामती : ...अन अजित पवार यांनी साधला समतोल

अभियानाचे वैशिष्ट्ये :

  • उद्देश : विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी

  • कालावधी : जानेवारी ते एप्रिल २०२२

  • वयोगट : बालवाटिका ते इयत्ता आठवीचे विद्यार्थी

  • अभियानासाठी हॅशटॅग : #100daysReadingCampaign #PadheBharat

  • १४ आठवडे इयत्तानिहाय विविध उपक्रमांचे आयोजन

  • शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यासह पालकांचाही सहभाग

‘‘शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी. वाचनातून त्यांच्यातील

"जिज्ञासूवृत्ती, कल्पकता याला वाव मिळावा, यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. या अभियानामुळे विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्ती आणि सर्जनशीलता वाढीस लागणार आहे. विविध प्रकारची माहिती शोधण्याची, ती समजून घेण्याची आणि त्यावर आत्मचिंतन करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित होण्यास मदत होईल. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये हे अभियान राबविण्याची सूचना देण्यात आली आहे.’’

- एम. डी. सिंह, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top