...तर राज्यातील बाजार 1 ऑक्‍टोबरपासून बंद!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

शासनाने निर्णय न घेतल्यास 1 ऑक्‍टोबरपासून नाईलाजास्तव व्यापारी बेमुदत बाजार बंद करतील असेही संचेती यांनी स्पष्ट केले आहे. या मध्ये नागरिकांना वेठीस धरण्याचा उद्देश नाही तर, बाजार समितीमध्ये सुधारणा करण्याचा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले. 

पुणे : शेतीमाल नियमनमुक्त करण्याच्या केंद्र सरकारच्या सुधारित निर्णयामुळे बाजारात मालावर सेस व बाजार समितीचा कर भरावा लागणार आहे. मात्र हाच माल बाजाराबाहेर नियमनमुक्त असणार आहे. त्यामुळे बाजार परिसर आणि बाहेरील मालाच्या किंमतीत फरक पडेल. लोक बाजाराऐवजी बाहेरून शेतीमालाची खरेदी करतील. त्यामुळे बाजार समित्या बंद पडतील. व्यापाऱ्यांचेही अतोनात नुकसान होईल. त्यामुळे बाजारातील शेतीमालही नियमनमुक्त करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. ही मागणी येत्या दहा दिवसांत मान्य न केल्यास 1 ऑक्‍टोंबरपासून बाजार बेमुदत बंद करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. 

शेतीमाल नियमनमुक्तीच्या निर्णयाबाबत राज्यातील व्यापारी प्रतिनिधींची ऑनलाइन बैठक झाली. ही बैठक राज्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मोहन गुरनांनी व दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे अध्यक्ष वालचंद संचेती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला राज्यातील कानाकोपऱ्यातून व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. या बाबत 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता "झूम'वर बैठक होणार आहे. त्यामध्ये 1 ऑक्‍टोबरपासून बाजार बंद करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, असे संचेती यांनी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संचेती म्हणाले, ""केंद्र सरकारच्या निर्णयानुसार शेतकरी आपला कृषीमाल कोठेही विकू शकतो. तसेच व्यापारी मार्केटयार्डाबाहेर कोठेही व्यापार करू शकतो. बाहेर त्याला कुठलाही खर्च लागणार नाही. त्यामुळे या क्षेत्रात लवकरच बलाढ्य कंपन्या तसेच परदेशी कंपन्या उतरतील. बाहेर काहीही खर्च नाही व मार्केटयार्डात सेस, देखरेख व इतर खर्च लागणार आहे. त्यामुळे आपोआपच मार्केटयार्डातील व्यापार कमी होणार आहे.'' व्यापाऱ्यांच्या परंपरागत व्यापारावर गंडांतर येणार आहे. बाहेरील मोठ्या कंपन्यांबरोबर मार्केटयार्डातील व्यापारी स्पर्धा करू शकणार नाहीत, असेही संचेती यांनी नमुद केले. 

ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार

परंपरागत व्यापार टिकण्यासाठी मार्केटयार्डातील खर्च कमी होणे नितांत गरजेचे आहे. तसेच बाजार समिती कायदा ब्रिटिशकालीन आहे. आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे या कायद्यातही योग्य बदल होणे ही काळाची गरज आहे. आदी विषयावर बैठकीत चर्चा झाली. याबाबत राज्य आणि केंद्र सरकारशी अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. व्यापारी प्रश्नांबाबत पुन्हा बैठक होणार आहे. तोपर्यंत शासनाने निर्णय न घेतल्यास 1 ऑक्‍टोबरपासून नाईलाजास्तव व्यापारी बेमुदत बाजार बंद करतील असेही संचेती यांनी स्पष्ट केले आहे. या मध्ये नागरिकांना वेठीस धरण्याचा उद्देश नाही तर, बाजार समितीमध्ये सुधारणा करण्याचा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state market will be closed from October 1